रावेर न्यायालयाबाहेर दोन गटात मारामारी

दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रार : नायगावसह कांडवेलच्या संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा ः संशयीतांची धरपकड

रावेर : कोर्टात आल्याच्या कारणावरून दोन गटात शाब्दीक वाद हाणामारीवर पोहोचला. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यास परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहिल्या गटाच्या तक्रारीवरून गुन्हा
पहिल्या फिर्यादीनुसार विनोद रामदास कोळी (33, नायगाव, ता.मुक्ताईनगर) हा त्याचा मित्रांसोबत सोमवार, 13 जून रोजी रावेर कोर्टात आले होते. त्यावेळी कोर्टाजवळून जात असतांना ईश्वर संतोष कोळी, दीपक वासूदेव कोळी आणि पूनम ईश्वर कोळी (सर्व रा.कांडवेल, ता.रावेर) यांनी कोर्टात असल्याच्या कारणावरून दोघांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तर विनोद कोळी याच्या डोक्यात दगड मारून शिवीगाळ केली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात विनोद कोळी यांच्या फिर्यादीवरून ईश्वर संतोष कोळी, दिपक वासूदेव कोळी आणि पूनम ईश्वर कोळी (सर्व रा.कांडवेल, ता.रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसर्‍या गटाने दिलेल्या फिर्यादीवरून पूनम ईश्वर कोळी (28, कांडवेल, ता.रावेर) या पती ईश्वर संतोष कोळी यांच्यासोबत सोमवार, 13 जून रोजी रावेर कोर्टात आल्या होत्या. कोर्टात केस असल्यामुळे ते कोर्टाजवळ आले असता समाधान ज्ञानेश्वर कोळी आणि विनोद रामदास कोळी (दोन्ही रा. नायगाव, ता.मुक्ताईनगर) यांनी विवाहितेसह पतीला मारहाण करण्यास सुरूवात केली. तर जीवे ठार मारण्या धमकी दिली. याप्रकरणी पूनम कोळी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात समाधान ज्ञानेश्वर कोळी आणि विनोद रामदास कोळी (दोन्ही रा.नायगाव, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस नाईक सुरेश मेढे करीत आहे.