काही सदस्यांनी नातलगांनाच लाभार्थी केल्याचा आरोप ; चौकशीची मागणी
रावेर- रावेर पंचायत समितीच्या वाढीव उपकर निधी (सेस फंड) चा निधी, रस्ता, दुरुस्तीसह काँक्रिटीकरण, मंदीर, हाय मास्ट लॅम्प, पीठाची गिरणी, बॅटरीवर चालणारे फवारणी पंप, पिको फॉल मशनरी आदींवर खर्च झाल्याचे सांगितले जात असलेतरी त्याबाबतची संपूर्ण कागदोपत्री माहिती देण्यास प्रशासनाने दिरंगाई दाखवली आहे तसेच या संपूर्ण निधीची माहिती देण्यास प्रशासन का धास्तावले आहे ? हा देखील प्रश्नच आहे त्यामुळे या सेस फंडामध्ये नक्कीच गौडबंगाल झाले असावे, अशी चर्चा आहे. माहिती देण्यास टाळाटाळ करणार्या प्रशासनाने संपूर्ण माहिती न देता फक्त कामाचे नाव आणि झालेला खर्चाची रक्कम एव्हढीच माहिती देऊन बाकीची माहिती दडपण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अंदाजपत्रके, स्पॉट व्हेरीफिकेशनची माहिती, काम पूर्ण झाल्याची माहिती, सदस्यांच्या शिफारशी, गिरणी, फवारणी देण्यात आलेल्या लाभार्थींची माहिती, मोजमाप पुस्तके, कामांचा फोटो तसेच संबधित काम केलेल्या ठेकेदारांची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. प्रत्येक सदस्याला सुमारे दोन लाख पंचात्तर हजार इतका सेस फंड मिळाला आहे. सभापती, उपसभापती आणि अजुन चार विद्यमान पंचायत समिती सदस्य सोडले तर बाकीच्या सदस्यांच्या सेस फंडच्या माध्यमातून केलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे.काही सदस्यांनी आपल्या नातलगांनाच लाभार्थी केल्याचाही आरोप आहे.