रावेर पंचायत समितीची डिजिटल इंडीयाकडे वाटचाल

0

रावेर। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत पं.स. शिक्षण विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचा व गतिमान प्रशासन राबविणेचा संकल्प गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केला असून शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. यामध्ये टेक्नोटीचर क्लबची स्थापना करुन 14 केंद्रातील प्रत्येकी 3 आणि खाजगी माध्य. 5 व खाजगी प्राथमिक 4 यांनी सहभाग घेतला.

विविध ऑनलाईन योजना प्रभावीपणे राबविणार
ऑनलाईन योजना प्रभावीपणे राबविणे व अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिक्षकांना सक्षम बनविणे हा यामागील हेतु आहे. तसेच ई-गव्हर्नन्सचा वापरात तालुक्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांचे ई-मेल आयडी घेण्यात येवून त्याद्वारे सर्व शाळा गटसाधनकेंद्राशी जोडण्यात येतील. यामुळे पत्रव्यवहार हा अधिक गतिमान होईल. यात 100 खाजगी मुख्याध्यापक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

व्हाटस् अ‍ॅपद्वारे मार्गदर्शन
व्हाट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, खाजगी प्राथमिक शाळा, खाजगी माध्यमिक शाळा अशा तीन ही प्रकारच्या शाळा मुख्याध्यापकांचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. त्याद्वारे संनियंत्रण व मार्गदर्शन करण्यात येत आहे. बिटस्तरीय प्रेरणा कार्यशाळेत ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येक बिटमध्ये प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. यात गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय तज्ञ, विशेष शिक्षक हे प्रगत व डिजिटल शाळांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

तालुक्यात 5 कार्यशाळा घेणार
तालुक्यात पाच बिट असून पाच कार्यशाळा घेण्यात येतील. तक्रार निवारण दिनात तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी तक्रार निवारण दिन गटसाधन केंद्र रावेर येथे आयोजित करण्यात येईल. या अंतर्गत प्राप्त होणारे शिक्षकांचे अर्ज प्राधान्याने निकाली काढण्यात येतील. असे गटशिक्षणाधिकारी विजय पवार व गटसमन्वयक नवाज तडवी यांनी कळविले आहे.