जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून धडक कारवाईची अपेक्षा ; समस्या सुटत नसल्याने उपोषणाच्या प्रमाणात वाढ
रावेर– तालुक्याचे मिनी मंत्रालय असलेल्या पंचायत समितीत दांडी बहाद्दर कर्मचार्यांमुळे नागरीकांची कामे खोळंबली असून त्यांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या वेळेवर पंचायत समितीचे कामकाज गेल्याने अनेक वर्षांपासून सुरू असून मुख्यालय राहण्याचा आदेश अधिकारी व कर्मचार्यांनी बासनात टाकला आहे. लोकप्रतिनिधींनी या संदर्भात कर्मचार्यांची कान उघाडणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तालुक्यावर पंचायत समिती असली तरी निष्काळजी दांड्या बहाद्दर अधिकार्यांमुळे ग्रामीण भागातून काम घेऊन येणार्या नागरीकांना मात्र मनस्ताप सोसावा लागत आहे. दुपारनंतर पंचायत समिती कोणीही राहत नसल्याने ग्रामीणचा विकास खुंटला आहे तर समस्या सुटत नसल्याने उपोषणार्थींची संख्यादेखील दिवसागणिक वाढत आहे.
अधिकार्यांचा कामकाज रेल्वेच्या वेळेवर
पंचायत समितीतील काही अधिकारी आपला कारभार रेल्वेच्या वेळापत्रकार चालवतात तर काही तालुक्यातले असल्याने थंब हजेरी लावून नंतर घराकडच्या शेतीकडे जातात. हा सर्व प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे याकडे गटविकास अधिकार्यांनीच दुर्लक्ष केल्याने त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. काही सन्माननीय अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे सेवादेखील बजावत आहेत हे देखील तितकेच खरे! विशेष म्हणजे प्रशासनाने गाजावाजा करीत थंब मशीन बसवले असलेतरी कर्मचारी केव्हा येतात व केव्हा जातात याचे हजेरी तपासण्याची तसदी घेतलेली नाही तसे झाल्यास निश्चित दांडी बहाद्दरांवर अंकुश बसेल, असेदेखील बोलले जात आहे.
यांची नियमित उपस्थिती
सुनील सूर्यवंशी, डी.एस.सोनवणे पी.आर.महाले, पराग पाटील, एस.एस.काळे, डी.व्ही.निळे, समाधान निंभोरे, भीमराम तायडे, चंदा सुरदास, मंजिश्री पवार, सुभाष पाटील, लक्ष्मण पाटील, भागवत सोनोवने, जी.एम.रिंढे यांच्यासह शिपाई नियमित सेवा बजावून ग्रामीण जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात मात्र अन्य अधिकारी व कर्मचारी उंटावरून शेळ्या हाकतात, असा उघड आरोप जनतेतून होत आहे. जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या बाबत गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा आहे.