रावेर पालिकेला विशेष निधी द्या ; जलसंपदा मंत्र्यांना साकडे

0

नगराध्यक्षांनी घेतली भेट ; रीक्त पदांचा अनुशेष भरण्याची गिरीश महाजन यांची ग्वाही

रावेर- रावेर पालिकेतील रीक्त पदे भरून विशेष निधी देण्याची मागणी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांच्यासह शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बुधवारी मुंबईत केली. अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात भेट घेण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक सुरज चौधरी, माजी उपनगराध्यक्ष व नगसेवक सुधीर पाटील उपस्थित होते.

रावेर पालिकेत रीक्त पदांचा सुकाळ
रावेर नगरपालिकेत पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरीकांच्या तक्रारी वाढून जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तत्काळ मुख्याधिकारी मिळण्यासह
एकूण 32 पैकी 23 पदे ही एक ते दोन वर्षापासून रिक्त असल्याने ही पदे भरण्याची मागणी करण्यात आली. स्वच्छता निरीक्षक, लिपिक, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, लेखा परीक्षक, कर निरीक्षक ,वरिष्ठ लिपिक, कार्यालय अधीक्षक आदी पदे रीक्त असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले तसेच नगरपालिका वाचनालय व बहुदेशीय हॉलसाठी दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. यापूर्वीही नगरसेवक अ‍ॅड.सुरज चौधरी व नगसेवक सुधीर पाटील यांनी 17 कोटी रूपयांचा विशेष निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीबाबतही पाठपुरावा करण्याचे सांगण्यात आले. शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रसंगी दिले.