रावेर पुरवठा प्रकरण : रेशन दुकानदारांचे जबाब घेण्यास सुरुवात

रावेर : रावेर पुरवठा विभागाच्या कथित प्रकरणाची चौकशीला सुरू झाली असून यासाठी तालुक्यातील सुमारे 148 रेशन दुकानदारांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी सांगितले. शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेल्या तहसीलदारांच्या शिक्क्यांचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड तीन रुपयांप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे या कारणावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तत्कालीन पुरवठा निरीक्षकांची बदली केली होती. या प्रकरणात आणखी कोणी कर्तव्यात कसूर केला ? याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणाची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग हे चौकशी अधिकारी आहे. तालुक्यात सर्वाधिक चर्चिला जाणार्‍या या प्रकरणात आता काय कारवाई होणार ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.