रावेर पोलिसांनी गुरांची अवैध वाहतूक रोखली : दोघांना अटक, 50 गुरांची सुटका

रावेर : मध्य प्रदेशातून लालमातीमार्गे महाराष्ट्रात गुरांची कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक रावेर पोलिसांनी रोखत सुमारे 50 गुरांची सुटका केली तर दोघा संशयीतांना अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पाल आऊट पोस्टला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गेल्या तीन दिवसात गुरांची अवैध रोखण्याबाबत दुसरी कारवाई झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. गुरांच्या अवैधरीत्या होणार्‍या वाहतुकीला कायमस्वरुपी पायबंद लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवार, 9 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील शेरी नाकामार्गे महाराष्ट्रात अवैधरीत्या गुरांनी भरलेला ट्रक येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रावेरचे निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लालमातीजवळ ट्रक (जे.के.01 एच.एल.1559) ची झडती घेतल्यानंतर त्यात सुमारे 50 वर गुरांची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे दिसून आले. ट्रकमधील गुरांची सुटका करून त्यांना जळगावच्या गो शाळेत हलवण्यात आले तर मध्यप्रदेशातील मंडसोळच्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. रात्री उशिरा आरोपींविरोधात पाल आऊट पोस्टला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गुरे तस्करांवर उपनिरीक्षकांची धडक कारवाई
दोन दिवसांपूर्वी चोरवड येथे गुरांची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखत 28 गुरांना जीवनदान दिले होते. पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले यांनी ही धडक कारवाई केली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा 50 गुरांना जीवनदान मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. उपनिरीक्षक सचिन नवले यांच्यासह कर्मचारी संदीप धनगर, राजेंद्र राठोड, ईस्माइल तडवी, सुकेश तडवी आदींनी ही कारवाई केली.