‘दैनिक जनशक्ती’च्या वृत्ताची दखल : मका खरेदीला 31 जुलैपर्यंत मिळाली मुदतवाढ
रावेर : रावेर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर मक्याचे उत्पादन घेण्यात आले होते शिवाय शासनाकडे मका विक्रीसाठी तब्बल बाराशे शेतकर्यांनी नोंदणी केली होती मात्र त्यातील अवघ्या 289 शेतकर्यांचा मका खरेदी झाल्यानंतर नोंदणी बंद करण्यात आल्याने उर्वरीत शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. शेतकर्यांच्या भावनांची दखल घेत दैनिक जनशक्तीने गुरुवार, 23 जुलैच्या अंकात ‘मका खरेदी बंदने शेतकर्यांवर संकट’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा मार्केटींग अधिकार्यांकडून गुरुवारी रात्री मका खरेदी करण्यासंदर्भात आदेश दिल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘जनशक्ती’मुळे मिळाला शेतकर्यांना दिलासा
रावेर तालुक्यात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते शिवाय सुमारे बाराशे शेतकर्यांनी आपला मका शासनाकडे विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती मात्र 289 शेतकर्यांचाच मका खरेदी होऊ शकला व कोणतीही सूचना न देता मका खरेदी केंद्र गेल्या आठ दिवसांपासून बंद करण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याचे सविस्तर वृत्त दैनिक जनशक्तीमध्ये गुरुवारी प्रसिध्द होताच जिल्हा प्रशासनाने दखल घेत गुरुवारी रात्री उशीरा आदेश जारी करून उर्वरीत शेतकर्यांकडील मका खरेदी करण्याचा सूचना दिल्या आहेत.
900 शेतकर्यांना मिळाला दिलासा
रावेर तालुक्यातील एकूण 1200 शेतकर्यांनी ऑनलाईन मका विक्रीसाठी नोंदणी केली असलीतरी केवळ 289 शेतकर्यांकडील मक्याची खरेदी झाल्यानंतर केंद्र बंद पडल्याने कोरोनाच्या संकट काळात शेतकर्यांवर पुन्हा संकट ओढवले होते माता आता उर्वरीत शेतकर्यांकडील मका खरदेसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. शासनाने मक्याला एक हजार 760 रुपये भाव निश्चित केला आहे.
शासनाकडून मुदतवाढ मिळाली
आठ दिवसांपासून बंद असलेल्या मका खरेदी केंद्राला शासनाकडून गुरुवारी रात्री उशीरा मुदतवाढ मिळाली आहे. मका खरेदी केंद्रावर आता 31 जुलैपर्यंत मका खरेदी केली जाऊ शकतो. जास्तीत-जास्त शेतक-यांनी मका खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी संजय सोनवणे यांनी केले आहे.
मका उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधान
आठ दिवसांपासून बंद पडलेले मका खरेदी केंद्र ‘दैनिक जनशक्ती’च्या बातमीनंतर सुरू झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासनाने मका खरेदी केल्याने आमची आर्थिक चणचण दूर होईल, अश्या भावना शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.