रावेर मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी दोन टँकरसह रुग्णवाहिकेची दिवाळी भेट !

0

भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरींची घोषणा ; आदिवासी पाड्यावर केली दिवाळी साजरी

रावेर- तालुक्यातील पाल अभयारण्यात दुर्गम भागात राहणार्‍या तांडा, वाडा, पाड्यावर आदिवासी बांधव सण-उत्सवाच्या आनंदापासुन कोसो दूर राहत असल्याने त्यांनाही दिवाळीचा आनंद लुटता यावा, चिमुकल्यांना नवीन कपड्यांसह फटाके फोडण्याचा आनंद घेता यावा यासह दिवाळीच्या फराळाची चव चाखता यावी या उद्देशाने भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी कुटुंबासह आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी कररून आदिवासींच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले. जनतेच्या समस्यांची जाण असून त्या सोडविण्यासाठी कायम झटणार असल्याचे सांगत त्यांनी रावेर मतदारसंघातील जनतेसाठी दोन टँकरसह रुग्णवाहिका भेट देणार असल्याची घोषणाही केली. आगामी विधानसभा निवडणूक रावेर मतदारसंघातून लवढवणार असल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला.

रावेरकरांना टँकरचा दिलासा
शासनाने रावेर, यावल तालुक्यात दुष्काळ घोषीत केला असून पाण्याची भुजल पातळी खालावून भविष्यात तीव्रपाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे शिवाय पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी रावेर, यावल तालुक्यातील जनतेच्या सेवे करिता दोन टँकर व रुग्णवाहिका दिवाळीनिमित्त विधानसभा मतदार संघाला भेट देणार असल्याचे अनिल चौधरी म्हणाले.

वाड्या-वस्त्यांवर जावून केली दिवाळी साजरी
रावेर विधानसभा मतदारसंघातील पाल परीसरातील गारबर्डी, अंधारमळी, गाडर्‍या, जामन्या, लंगडा अंबा, जीन्सी, अभोडा, पालसह अतिदुर्गम भागातील जंगलात राहाणार्‍या तांडा, पाडा, वाडा वस्त्यांवर जावून अनिल चौधरी यांनी आदिवासी कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणल्या. आदिवासींच्या कुटुंबात मिसळून त्यांच्यासोबत जेवण व फराळाचा आनंदही घेतला. लोकप्रतिनिधीने आदिवासींसोबत आठवडाभर जंगलात राहून दिवाळी साजरा करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे आदिवासी बांधव म्हणाले.

जनसेवेसाठी कटीबद्ध ; जनता आपल्या पाठिशी -अनिल चौधरी
आगामी विधानसभा निवडणूक रावेर मतदारसंघातून लढण्याची तयारी असून जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचा निश्‍चित आपला प्रयत्न असून जनता जर्नादन निश्‍चितच माझ्याच पाठिशी आहे व राहिल, असे अनिल चौधरी म्हणाले. आदिवासींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करणार आहे. त्यांच्या न्याय, हक्कासाठी झटणार असल्याचे त्यांनी नमूद केले.