रावेर ।तालुक्यातील अवैध दारुविक्री बंद करावी तसेच अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडीतर्फे रावेर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांनी पोलिसांच्या अंगावर बांगड्या, साडी भिरकावली. रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदा बाविस्कर, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली रावेर पोलीस स्टेशनवर महिलांचा मोर्चा धडकला.
पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
यावेळी मोर्चेकरांनी अवैध दारु विक्री बंद झालीच पाहिजे, अवैध धंदे बंद झालेच पाहिजे, रावेर पोलीस हाय-हाय, पोलीस निरीक्षक काळे मुर्दाबाद अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर मोर्चेकरांतर्फे नायब तहसिलदार यु.डी. कडनोर यांना निवेदन देण्यात आले.
दारुमुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी
दरम्यान, तालुक्यात सर्रासपणे दारुविक्री केली जात असल्यामुळे युवा पिढी व्यसनाच्या आहारी जावून त्यांचे भवितव्याचे नुकसान होत आहेे तसेच मजूर वर्ग दिवसभराची कमाई दारुमध्ये लावून अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या बाबींकडे गांभिर्याने लक्ष देवून अशा धंदेवाईकांवर कारवाईची मागणी मोर्चेकर्यांनी केली आहे.
या आहेत मागण्या
रावेर तालुक्यातील अवैध दारु विक्री बंद करावी, दारु विक्री करणार्यांना हद्दपार करावे, रावेर तालुक्यातील सट्टा, पत्ता व इतर अवैध धंदे बंद करावे, रेखा महाजन यांच्या हत्येची चौकशी करावी, रावेर कृषी विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी कराव व जाणिवपुर्वक सोडण्यात आलेल्या गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे, 8 मार्चचे महिलांवरील गुन्हे मागे घ्यावे, पोलीस निरीक्षक काळे यांना तात्काळ निलंबित करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.