रावेर रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्यासाठी प्रवासी संघटनेकडून निवेदन

0

आंदोलन छेडण्याचा ईशारा : लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची अपेक्षा

रावेर- रावेर रेल्वे स्टेशनवर विविध गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी स्टेशन मास्टरांसह वरीष्ठांना निवेदन देण्यात आले. तसेच दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला. रावेरवरुन भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, नाशिक, मुंबई, पुणे येथे जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. ये-जा करण्यास पुरेशी सार्वजनिक वाहने नसल्याने प्रवासी संघटनेचे सर्वेसर्वा प्रशांत बोरकर यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत निवेदन दिले. याप्रसंगी लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

अशा आहेत मागण्या
पुणे-खंडवा नवीन पॅसेंजरसह बर्‍हाणपूर-सुरत तसेच अमरावती-नागपूरकडे नवीन पॅसेंजर सुरू करावी, महानगरी, सचखंडसह अनेक गाड्यांना रावेर स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर राठोड, मनोहर लोहार, सुनील वाणी, शशांक बोरकर, कैलास पारधी, किशोर जयसिंघाणी, धनराज चांदवानी, राजेश शर्मा, प्रकाश पाटील, अ‍ॅड.स्वप्नील सोनार, रामकृष्ण चौधरी, कैलास पाटील, रशीद तडवी, युवराज महाजन, दिलीप पाटील यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

मागण्यांबाबत पाठपुरावा करणार
निवेदन देतांना असंख्य अप-डाऊन करणारे प्रवासी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्टेशन मास्टर यांच्याशी प्रशांत बोरकर व प्रवाशांनी चर्चा केली. त्यांनी वरीष्ठांकडे मागण्या मान्य करण्यासाठी प्रस्ताव पाठवून कार्यवाहीचा अहवाल देऊ, असे आश्‍वासन दिले. रावेर रेल्वेस्थानकाच्या उत्पन्नात वाढ झाली तर नक्कीच गाड्यांना येथे थांबा मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.