29 जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड नुकतीच पार पडली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाकरीता भाजपांतर्गत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अखेर जिल्हा परिषद अध्यक्षपदी जळगाव लोकसभा मतदारसंघातील कासोदा-आडगाव जिल्हा परिषद गटातुन निवडुन आलेल्या माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी रावेर लोकसभामतदारसंघातील निंभोरा-तांदलवाडी गटातुन निवडुन आलेले नंदकुमार महाजन यांची वर्णी लागली. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष विषय सभापतीपदाच्या निवडीकडे लागली आहे. भाजपाच्या 33 जिल्हा परिषद सदस्यांपैकी रावेर लोकसभा मतदारसंघातुन सर्वाधिक 22 सदस्य निवडुन आले आहे. अध्यक्षपदाकरीता रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेक दावा करीत होते. मात्र अध्यक्षपदाची संधी हुकली आता विषय समितीच्या सभापतीपदा करीता भाजपामध्ये रस्सीखेच सुरु असून 4 पैकी 3 सभापतीपद रावेर लोकसभा मतदारसंघाला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाजन – खडसे गटात चढाओढ
सभापतीपदासाठी भाजपाचे अनेकजण इच्छुक आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने आणि अंतर्गत नाराजी टाळणे हा भाजप नेत्यांसमोरीला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सभापतीपदी कुणाची निवड करावी, असा प्रश्न आहे. यातच महाजन व खडसे गटात याबाबतची अधिकची चढाओढ सुरू आहे. इच्छुकांमध्ये आमदार संजय सावकारे यांच्या वहिनी पल्लवी सावकारे, पोपट भोळे, रंजना जे.चव्हाण, अमित देशमुख , रवींद्र सूर्यभान पाटील, लालचंद पाटील, ज्योती राकेश पाटील आदींचा समावेश आहे. या सदस्यांचे कुटुंबीय व इतरांकडून वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
काँग्रेसच्या एकाला मिळणार पद
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 34 जागेची आवश्यकता असल्याने आणि भाजपाकडे 33 जागा असल्याने अध्यक्षपदाकरीता केवळ एका जागेची आवश्यकता होती. भाजपाला सत्ता स्थापनेसाठी कॉग्रेसचे सदस्य पाठींबा देण्याकरीता अनुकुल असल्याचे दिसून येत होते. कॉगे्रसच्या 4 सदस्यांपैकी आर.जी.पाटील हे पहिल्यापासूनच पाठींबा देण्याकरीता अनुकुल होते. त्यांच्या पत्नी अरुणा पाटील यांना महिला व बालविकास सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. अरूणा पाटील हे देखील रावेर लोकसभा मतदार संघातील आहे.
सभापती निवड प्रक्रिया
शनिवारी 1 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यत विविध समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहे. दुपारी 3 वाजता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीसाठी विशेष सभा होईल. 3 वाजेनंतर 15 मिनिटे माघारीकरीता वेळ दिली जाणार आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात ही सर्व प्रक्रिया पार पार पडणार आहे.