मतदारांसह नवमतदारांना सेल्फिची भुरळ ; गैरसोयींमुळे निवडणूक कर्मचारी त्रस्त
भुसावळ- रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात वाजेपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर सकाळी सात ते नऊ दरम्यान पहिल्या दोन तासात रावेर मतदारसंघासाठी 8.7 टक्के मतदान झाले तर सात ते 11 दरम्यान चार तासात 20 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भुसावळात रणरणत्यात उन्हामुळे तुरळक मतदान केंद्रावर रांगा लागल्या असून विभागातील फैजपूरसह यावलमध्ये मात्र मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत मतदारांसाठी सेल्फि पॉईंटची व्यवस्था असल्याने मतदारांसह नवमतदारांना त्याची भुरळ पडत आहे.
भुसावळ । शहरातील कोटेचा महिला महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 15वर, सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवली आहे. या मतदान केंद्रावरील सर्व कामकाज महिला सांभाळणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाईदेखील महिलाच असून, बंदोबस्ताची जबाबदारीदेखील महिला पोलिस कर्मचार्यांकडे आहे.
भुसावळातील सखी मतदान केंद्रावर महिलांची गर्दी
भुसावळ शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने या केंद्राला सखी मतदान केंद्राची उभारण्यात करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर 786 मतदार हक्क बजावणार असून यात 371 महिलांचा सहभाग आहे. अधिकाधिक संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून हा उपक्रम राबवण्यात आला. कोटेचा महाविद्यालयातील सखी मतदान केंद्रात गुलाबी रंगाचे आकर्षक पडदे लावण्यात आले असून फुग्यांनी सजावट करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर महिला अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेल्फि पॉईंटचे आकर्षण
यंदाच्या निवडणुकीत मतदारांसह नवमतदारांना सेल्फि पॉईंटची भुरळ पडत आहे. मतदान झाल्यानंतर कुटुंबासह मतदानाला आलेले सदस्य कुटुंब तसेच स्वतंत्रपणे आपला सेल्फि काढत आहेत.