रावेर लोकसभेसाठी भाजपाच्या खासदार रक्षा खडसेच अधिकृत उमेदवार

0

उमेदवारी निश्‍चित ; कोअर कमेटी सायंकाळपर्यंत जाहीर करणार अधिकृत निर्णय

जळगाव/भुसावळ- जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी निश्‍चित झाली असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कोअर कमेटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सांगितले. रविवारी सायंकाळपर्यंत पक्षाकडून अधिकृतरीत्या याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नेमकी उमेदवारी मिळणार कुणाला? याबाबत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू असलेतरी खडसे यांच्या नावावरच कोअर कमेटीत शिक्कामोर्तब झाल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे तर जळगाव लोकसभेच्या जागेसाठी अद्यापही निर्णय झाला नसल्याचे समजते.

विद्यमान खासदारांनाच मिळाली संधी
रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे व अजय भोळे या दोघांचीच नावे इच्छुकांमध्ये होती. पक्षाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देत रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्‍चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव लोकसभा मतदारसंघातून आमदार स्मिता वाघ व करण पवार यांच्या नावांबाबत रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर आता या मतदारसंघात काँग्रेस की राष्ट्रवादी? हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे. रविवारी सायंकाळी भाजपा कोअर कमेटी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत बैठक सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले.