रावेर वनक्षेत्रात आढळल्या 15 वन्यजीवांच्या प्रजाती

0

रावेर । येथील वनपरिक्षेत्रातील सुकी नदी परिसर, निमड्या व बोरघाट व्हिवपॉईंट अशा तीन पथकांद्वारे 10 ते 12 मचाणी उभारून शीतल चांदण्यात केलेल्या प्राणी प्रगणनेत 15 वन्यजीवांच्या प्रजाती आढळून आल्याची माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे यांनी सांगितली. दरम्यान पेसा कायद्यांतर्गत वनौपजाच्या व्यवसायासाठी तसेच अतिक्रमण करण्यासाठी जंगलात वारंवार लागणार्‍या आकस्मिक आगींच्या वनव्यांमुळे वन्यजीवांचा अधिवास संपुष्टात येत आहे. यामुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्यामुळे परिसरातील वन्यजीवप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पक्ष्यांच्या दीडशेवर प्रजाती आढळल्या
रावेर वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या सुमारास चांदण्यांच्या प्रकाशात चिंचाटी-सुकी नदी परिसर, निमड्या व बोरघाट व्हिवपॉईंट असे तीन वनपाल व नऊ वनरक्षकांचे तीन पथके तयार करून 10 ते 12 मचाणी उभारून वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. यामध्ये 5 बिबटे, 25 हरणांचे, 2 कोल्ह्यांचे 4 कळप, 1 रानमांजर, 1 सायर, 2 ससे, 2 अस्वल, 2 नीलगाय पथकातील कर्मचार्‍यांना आढळून आले. वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यांच्या परिसरात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास, रात्री 9 वाजता व पहाटे 4 वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्यजीवांच्या प्रजाती आढळून आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पाल वनक्षेत्रात पक्षांच्या 150 ते 200 प्रजाती आढळत असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे, प्रादेशिक वनक्षेत्रपाल सोनवणे, वन्यजीव पाल, वन्यजीव प्रेमी दिपक नगरे, वनपाल बी.टी.तायडे, के.डी. गुजर, वनरक्षक प्रादेशिक अतुल तायडे, विकास सोनवणे, हरिष थोरात, संभाजी सुर्यवंशी, गोकुळ गोपाळ, महिला वनरक्षक वन्यजीव अश्विनी ठाकरे, निल‘ परदेशी, वंदना विसपुते, वनमजुर तसेच वन्यजीव प्रेमी गणेश महाजन, तारीक नुरी आदी उपस्थित होते.