शहरालगतच्या नागरी वस्त्यांचा समावेश नगरपालिका हद्दीत व्हावा
रावेर- शहराच्या विकासासाठी आजी-माजी नगराध्यक्ष शहरालगतच्या नागरी वस्त्यांचा समावेश नगरपालिका हद्दीत व्हावा, भव्य ग्रंथालय आणि सभागृह बांधण्यास अनुदान मिळावे, रस्त्यांसाठी विशेष निधी मिळावा यासाठी नगराध्यक्ष दारा मोहम्मद व माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी एकत्रित येवून माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना निवेदन दिले.
शहराचा सर्वांगीण विकासासाठी राजकारण बाजूला
नगराध्यक्ष दारा मोहम्मद व माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी आमदार हरीभाऊ जावळे यांना देखील निवेदन दिले आहे. तसेच माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना दिलेल्या निवेदनात रावेर शहराचा विस्तार होवून शहराच्या लगत असलेल्या नागरी वसाहत अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित आहेत अश्या भागाचा नगरपालीका हद्दीत समावेश करण्यात यावा.रावेर क दर्जाची नगरपालिका असून सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 27039 असून शहर झपाट्याने वाढत आहे. त्या प्रमाणात येथील विकासासाठी मिळणारा निधी हा तोडक्या स्वरूपाचा मिळतो.
वाचनालय आणि बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी निधी
रावेर मधील सी.स.नं.364/अ -3 /1 मध्ये वाचनालय आणि बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी निधी आवश्यक आहे. वरील दोन्ही विकासकामांसाठी वैशिष्टयपूर्ण योजनेतंर्गत पाच कोटी रुपये तसेच याच प्रमाणे शहरातील आणि रावेर नागरी वस्त्यांच्या रस्ते विकासासाठी देखील जवळपास पाच कोटी रुपये आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी केंद्र सरकार अथवा राज्य सरकारकडून सदर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यानी दिला सकारात्मक होकार
आजी-माजी नगराध्यक्षांनी खासदार रक्षा खडसे यांचीदेखील भेट घेतली. यावेळी त्यांनी हद्दवाढ होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेवून चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक होकार दिल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.