शासन दरबारी रखडलेला प्रस्ताव त्वरीत मार्गी लावण्याची केली मागणी; 1882 पासून पालिकेचा विस्तारच होईना
रावेर । येथील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्राची हद्द वाढविण्यात यावी म्हणून शासन दरबारी रखडलेला प्रस्ताव त्वरीत मार्गी लावावा म्हणून नगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवक एकवटले असून त्यांनी या बाबत सर्व बाबी खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या भेटी घेवून त्यांच्या निदर्शनास आणून देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन स्पष्ट केली भूमिका
नगरविकास मंत्रालयाकडे सादर केला प्रस्ताव
याबाबत नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांच्या अध्यक्षत्वाखाली घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, आरोग्य सभापती अॅड. सुरज चौधरी यांनी माहिती दिली की, रावेर शहराच्या झपाट्याने विकास होत असून सन 1882 मध्ये स्थापन झालेल्या नगरपालिकेचा विस्तार झालाच नाही. सन 2012 मध्ये हद्दवाढ व्हावी म्हणून प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे सादर केला असून तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी देखिल यात पाठपुरावा केला असून सन 2014 मध्ये प्रस्तावातील तृटी दूर करुन जा.क्र.1362/2014 दि.5 ऑगस्ट 2014 मध्ये प्रस्ताव पुन्हा सादर केला आहे. सन 2001च्या जनगणने नुसार एकूण लोकसंख्या अकृषीक रोजगाराची टक्केवारी सुमारे 45 टक्के एवढी आहे. या बाबतचे प्रमाणपत्र देखिल सादर करण्यात आले आहे. अकृषीक रोजगाराची टक्केवारी लक्षात घेतल्याने पालिकेची हद्दवाढ होणे क्रमप्राप्त आहे.
सुविधा प्राप्त होणार
आज शहरालगत असलेल्या अकृषीक भागात राहत असलेल्या रहीवाशांना नगरपालिकेतर्फे मुलभूत सोयी-सुविधा प्राप्त होतील अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी सर्व शासकीय तरतुदींची पुर्तता केली जात असल्याचे सांगितले. तसेच अॅड. सुरज चौधरी यांच्यासह नगरसेवकांनी खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे आणि जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना भेटून संपूर्ण प्रकरणाच्या प्रती देण्यात आल्याचे सांगण्यात आले तर पत्रकार परिषदेत राजेंद्र महाजन, अॅड. सुरज चौधरी, असदुल्ला खान महेबुब खान, आसीफ मोहंम्मद दारा मोहम्मद, सुधीर पाटील, यशवंत दलाल, शेख सादीक अब्दुल नबी, अॅड. योगेश गजरे, भास्कर महाजन, मुन्ना अग्रवाल, अय्युब पठाण, शेख कलीम, गोपाल बिरपन, धोंडू वाणी सह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.