रावेर । पोलिसांच्या गस्तीलाच थेट चोरट्यांनी शहरात आव्हान दिले असून पुन्हा दोन बंद घरांमध्ये घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी गस्त वाढवून वाढत्या चोर्यांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील सोनू पाटील नगरातील रहिवासी अभिमन्यू बोदवडे हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडत एलईडी टीव्ही लांबवला तर दुसर्या ठिकाणी रमेश भामरे हे पुण्याला गेल्याने घराला कुलूप असल्याने येथेही चोरीचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने या घरातून काहीही चोरीला गेले नसल्याचे सांगण्यात आले. याच परीसरातून एक दुचाकीदेखील लांबवली गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसात मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.
बंद घरांना टार्गेट
शहरात चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केल्याचे आतापर्यंतच्या घरफोड्यांवरून लक्षात घेते. शिवाय चोरटे निर्जन भागातील कॉलन्यांमध्ये दिवसा टेहळणी करून रात्री काम फत्ते करीत असल्याने नागरिकांनी बाहेरगावी जाताना पोलीस ठाण्यात सूचना द्यावी तसेच मौल्यवान दाग-दागिने व अधिकची रक्कम बँक लॉकरजमध्ये जमा करावी व रात्रीच्या वेळी घराबाहेर विजेचा बल्ब सुरू ठेवावा, असे आवाहन रावेर पोलिसांनी केले आहे.