रावेर । येथे प्रवासी आणि मालगाड्यांच्या सातत्याच्या वर्दळीमुळे रावेर स्टेशन (भोर)जवळील रेल्वे गेट अनेकवेळा बंद असते. परिणामी रावेरातून मुक्ताईनगर, तसेच पुढे अंतुर्ली मलकापूरकडे जाणार्या वाहनांचा खोळंबा होतो. पुनखेडा-पातोंडी रस्तादेखील खराब असल्याने वाहने चालवता येत नसल्याची दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे. रावेरहून मुक्ताईनगर तसेच अंतुर्ली पुढे मलकापूर जाण्यासाठी पुनखेडा-पातोंडी किंवा रावेर स्टेशनमार्गे असे दोन रस्ते आहेत. मात्र, पुनखेडा-पातोंडी हा किलोमीटरचा रस्ता प्रचंड खराब असल्याने वाहन चालवता येत नाही. परिणामी वाहनचालक रावेर स्टेशन या पर्यायी रस्त्याचा वापर करतात. परंतु, रावेर स्टेशन (भोर)जवळील रेल्वे गेट मध्य रेल्वेच्या मार्गावर असल्याने प्रवासी, मालगाड्यांची सतत वाहतूक सुरू असल्याने बंद असते. अनेकवेळा एकामागून एक चार ते पाच गाड्या पास केल्या जातात. परिणामी वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागते. याशिवाय रेल्वेरूळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी गेट अनेकवेळा दिवसभर बंद असते. त्यामुळे एकीकडून खड्डेमय रस्त्यावर, तर दुसरीकडे बंद राहणार्या रेल्वे गेटमुळे विलंबाने प्रवास अशा कोंडीत वाहनचालक, प्रवासी सापडतात. ही समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपूल तयार करावा. त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल अशी मागणी वाहनचालकांमधून पुढे येत आहे.