राष्ट्रकुल गैरव्यवहारः माजी पंतप्रधानांवर ठपका

0

नवी दिल्ली । 2010 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासंदर्भात चौकशी करणार्‍या संसदीय लोकलेखा समितीने अंतिमत: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर ठपका ठेवणारा अहवाल औपचारिकरीत्या स्वीकारला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) बंद करण्यात आलेल्या सहा संवेदनशील प्रकरणांची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, असे आवाहन या अहवालाच्या माध्यमामधून केले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांची झालेली नेमणूक व गैरव्यवहाराचा फटका बसलेल्या या स्पर्धांच्या गलथान संयोजनासंदर्भात या अहवालामध्ये पंतप्रधान कार्यालयावर ताशोरे ओढण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचे निरीक्षण या अहवालाच्या माध्यमामधून नोंदवण्यात आले आहे.

राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संवेदनशील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात पीएमओने जबाबदारी ढकलण्याऐवजी या प्रकल्पांचा प्रभावी पाठपुरावा करावयास हवा होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवेळी असे का झाले नाही, याचे स्पष्टीकरण क्रीडा मंत्रालयच देऊ शकेल, अशी पीएमओकडून घेण्यात आलेली भूमिका संदिग्ध आहे. या प्रकरणी केंद्रीय सचिवालयही जबाबदारीचे योग्य पालन करू शकले नाही; आणि राजकीय दबावाखाली झुकले,” असे या अहवालामध्ये म्हटले आहे.