राष्ट्रकुल स्पर्धेत येणार क्रिकेट!

0

नवी दिल्ली । बर्मिंगहॅमला राष्ट्रकुल स्पर्धा 2022 चे यजमानपद मिळाल्यास त्यामध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश होऊ शकतो. आर्थिक आणि राजकीय वाद सुरु असल्याने यजमानपदाच्या शर्यतीतून डरबनने आपले नाव मागे घेतल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदासाठी ब्रिटन सरकारकडून बर्मिंगहॅमचे नाव सुचवण्यात आले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत आवश्यक असणार्‍या खेळांच्या यादीत क्रिकेटचा समावेश होत नाही. क्रिकेटचा समावेश पर्यायी खेळांच्या यादीत होतो. राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद स्वीकारणारे देश क्रिकेटचा समावेश करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ शकतात. मलेशियामध्ये 1998 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इंग्लंडने आपला संघ पाठवला नव्हता. यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यानंतर पुन्हा राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला नव्हता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम सामना जिंकला होता.

केवळ टी-20 सामने
डरबनमध्ये होणार्‍या राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. बर्मिंगहॅममधील स्पर्धेत आयसीसी आणि ईसीबीच्या मदतीने क्रिकेटचा समावेश करण्याचा मानस वर्कशेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील स्नोबॉल यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये क्रिकेटचे स्वरुप टी-20 असेल. एजबेस्टन आणि वर्सेस्टशायरच्या न्यू रोड होममध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत बर्मिंगहॅमसोबतच कॅनडा, मलेशिया आणि ऑस्ट्रेलियामधील शहरांचादेखील समावेश आहे. यासोबतच लिव्हरपूलही यजमानपदासाठी उत्सुक आहे.

बीसीसीआय- आयसीसी तिढा कायम
नवी दिल्ली । आयसीसीच्या उत्पन्नातील वाट्यावरून बीसीसीआय (भारतीय क्रिकेट मंडळ) आणि आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) यांच्यात सुरू असलेला तिढा अजूनही कायम राहिला आहे. बीसीसीआयला आणखी 100 कोटी डॉलर देण्याचा आयसीसीने दिलेला प्रस्ताव बीसीसीआयने नाकारला आहे. आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांनी उत्पन्नाच्या वाट्याच्या विभागणीचे नवे मॉडेल तयार केले, त्याच वेळी आम्हाला 100 कोटी डॉलर देण्याचा त्यांनी प्रस्ताव दिला आणि उत्तर देण्याची अंतिम मुदतही दिली; परंतु आम्हाला हा प्रस्ताव मान्यच नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याचा प्रश्‍नच नाही, असे दुबईतील बैठकीसाठी उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी सांगितले. बीसीसीआय आणि मनोहर यांच्यात आता विश्‍वासाचे नाते राहिले नसल्याचेही सांगितले जात आहे.