राष्ट्रध्वज सन्मान जिल्हा समिती स्थापन करा

0

नंदुरबार। राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाण्याविषयी व्यापक प्रबोधन करण्यासाठी जिल्हा समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याचे पालन व्हावे तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन करण्याला हिंदु जनजागृती समितीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी हे निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले आहे की, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस साजरे करतांना प्लास्टिकचे ध्वज वापरले जातात. परंतु ते लवकर नष्ट होत नसल्याने त्याची विटंबना होत राहते.

जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन
राष्ट्रध्वज हा राष्ट्राची अस्मिता असल्याने हा अवमान रोखला जावा. यासाठी हिंदु जनजागृती समितीने 14 वर्षांपासून प्रबोधन चालवले असून 2011 साली न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्चन्यायालयाने निकाल देऊन शासनाला जिल्हास्तरीय समित्या स्थापून अवमान रोखण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये अन्य काही जिल्ह्यात समित्या स्थापन झाल्या. परंतु नंदुरबार जिल्ह्यात अद्याप समिती स्थापन झालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्र ध्वजाचा सन्मान राखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीने तयार केलेली प्रबोधनात्मक सीडी सर्व चित्रपट गृहातून व वृत्तवाहिन्यांवरून प्रदर्शीत करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे. निवेदन देतांना जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, भावना कदम, आकाश गावित, डॉ.नरेंद्र पाटील हे उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी जिल्हास्तरीय समिती लवकरच स्थापन करू व त्यावर हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीला स्थान देऊ, असे आश्‍वासन दिले.