नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ कमालीचे वाढले असून, आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपकडे निर्णायक मते आली आहेत. त्यामुळे भाजप आपला पसंतीचा राष्ट्रपती निवडू शकणार आहेत. राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत असले तरी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी इच्छुक असल्याची चर्चाही राजधानी नवी दिल्लीत सुरू झाली होती. तथापि, पवारांना भाजपच्या मदतीने राष्ट्रपती करण्याचेही मोदींच्या डोक्यात घोळत असल्याचे राजकीय सूत्राचे म्हणणे आहे. त्यातच बुधवारी पवारांनी मोदींची खासगीत भेट घेऊन चर्चा केल्याने या चर्चेला आता ऊत आला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पवार-मोदी भेटीत काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. तसेच, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाली असावी, अशी शक्यताही सूत्राने वर्तविली.
… तर शरद पवार ठरू शकतात सर्वपक्षीय उमेदवार!
पाच राज्यांचे निवडणूक निकाल हाती येण्याआधीच 8 मार्चला सोमनाथ येथे झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत राष्ट्रपतिपदाबाबतची चर्चा झाली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह स्वतः लालकृष्ण अडवाणी यांची उपस्थिती होती. याच बैठकीत उत्तरप्रदेश निवडणुकीचे निकाल भाजपला पुरक लागले तर अडवाणींना राष्ट्रपतिपदाची गुरुदक्षिणा देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. तथापि, मोदी यांना वेळोवेळी राजकीय सल्ला देण्याचे काम करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही राष्ट्रपती बनविण्याची मोदींची इच्छा असल्याची माहिती राजकीय सूत्राने दिली. आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने आपण राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवू शकत नाही, असे पवार सांगत असले तरी, भाजपच्या सहाय्याने ते राष्ट्रपती भवनात पोहोचू शकतात. पवारांच्या नावाला भाजपचा विरोध झाला नाही तर इतर कुणी पक्षही त्यांना विरोध करू शकत नाही, असेही सूत्र म्हणाले. एव्हना, मराठी माणसाच्या मुद्द्यावर अगदी शिवसेनेची मतेही पवारांना मिळू शकतात, असेही सूत्राने स्पष्ट केले.
लोकसभेत खासदारांकडून मोदींचे स्वागत
सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ यावर्षी जुलैमध्ये संपणार आहे. त्यानंतर अडवाणी किंवा पवार यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. दरम्यान, बुधवारी पवार यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मोदी-पवार भेट झाली. तब्बल 15 ते 20 मिनिटे या दोन नेत्यांत चर्चा झाली. या भेटीमागील कारण कळू शकले नसले तरी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, उत्तरप्रदेशातील नेतृत्वाची निवड, शेतकरी कर्जमाफी आदींबाबत या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती पवारांच्या निकटवर्तीयांनी दिली. पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पहिल्यांदाच संसदेत आले होते. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना मोदी लोकसभेत दाखल झाले. यावेळी निवडणुकीतील यशाबद्दल उपस्थित खासदारांनी मोदींचे टाळ्या वाजवून स्वागत केले. संसदेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर मोदी व पवार हे पंतप्रधान कार्यालयात गेले.
शेतकरी कर्जमाफीसाठी पवारांचा आग्रह
दरम्यान, या भेटीत शेतकर्यांचे कर्जमाफ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केल्याचेही सूत्राने सांगितले. यावेळी पवारांनी पंतप्रधानांकडे कृषी व इतर विषयांबाबतही चर्चा केली. महाराष्ट्रात होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या ही चितेंची बाब असून, केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी पवारांनी यावेळी केली. त्याशिवाय साखर उद्योगांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबतही चर्चा केल्याचे समजते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशीही मागणी या भेटीत करण्यात आली.