राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले बैलगाडा शर्यतीचे विधेयक शासनाच्या राजपत्रात!

0

पिंपरी-चिंचवड : बहुप्रतिक्षीत बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्या विधेयकाची नोंद 31 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात करण्यात आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधेयकाच्या राजपत्राची प्रत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सुपूर्द केली. शासनाच्या राजपत्रात बैलगाडा शर्यतीच्या विधेयकाची नोंद झाल्याने अखेर बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीला शासनाने रितसर परवानगी द्यावी, यासाठी आमदार लांडगे यांनी जोरदार पाठपुरावा केला होता. त्यामुळेच बैलगाडा शर्यतीला आता हिरवा कंदिल मिळाला आहे.

22 जुलै रोजी राष्ट्रपतींची स्वाक्षरी
बैलगाडा शर्यतीबाबत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना मागील काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. 22 जुलै रोजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे बैलगाडा मालकांसह शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करत बैलगाडा शर्यतीला मान्यता देण्यात आली आहे.

सांस्कृतिक परंपरा जपण्याचा उद्देश
महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने बैलगाडा शर्यत आयोजित करता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून बैलगाडा शर्यतीबाबत नियम आणि अटी प्रसिद्ध करण्यात येतील. सांस्कृतिक परंपरांना सुरू ठेवणे, हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. शर्यतीत वापरण्यात येणार्‍या प्राण्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचता कामा नये; अन्यथा संबंधितांवर पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड किंवा तीन वर्षापर्यंत कारावास होऊ शकणार आहे.

नवीन प्रजातींची पैदास होणार
बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने सांस्कृतिक व पारंपरिक प्रथांचे रक्षण होणार आहे. तसेच बैलांच्या मूळ प्रजातींचे संवर्धन वाढीस लागून नवीन प्रजातींची पैदास चांगल्या पद्धतीने होणार आहे. जनावरांची शुद्धता, सुरक्षा आणि स्वास्थ्य यामुळे सांभाळणे सोयीस्कर होणार आहे. केंद्रासह राज्य शासनाने बैलगाडा शर्यतीसाठी मान्यता दिल्याने बैलगाडा मालक व शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता पुन्हा एकदा शर्यतीच्या मैदानात भिर्रर्रर्र ऽऽ आवाज घुमणार आहे.