राष्ट्रपतींच्या हस्ते बाल शौर्य पुरस्काराचे वितरण; २२ मुलांचा सन्मान !

0

नवी दिल्ली: देशातील शौर्य गाजविणाऱ्या बालकांचा राष्ट्रपतींचा हस्ते सन्मान केला जात असतो. बाल शौर्य पुरस्काराने मुलांना गौरविण्यात येत आहे. यंदा २२ मुलांना बाल शौर्य पुरस्कार देण्यात येत आहे. आज बुधवार सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. देशभरातून 10 मुली आणि 12 मुले अशा एकूण 22 जणांना काल पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन बालकांचा समावेश आहे. मुंबईची सहावीत शिकणारी झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून 17 जणांची सुखरूप सुटका केली होती. आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीला वाचविले होते.

गेल्यावर्षी 22 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी मुंबईतील परळ येथील क्रिस्टल टॉवर या 17 मजली इमारतीला आग लागली होती. त्यावेळी झेन सदावर्ते हिने आगीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवले होते. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या आकाश खिल्लारेने एका पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला. आकाश शाळेत जात असताना त्याला बुडणाऱ्या माय लेकी दिसल्या. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता या दोघींना वाचवलं. नदीवर कपडे धुण्यासाठी आई आणि मुलगी गेल्या होत्या.