मुंबई – येत्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह येत्या रविवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री, या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अमित शाह उद्या म्हणजेच शुक्रवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची माहिती दानवे यांनी दिली. या काळात त्यांच्या भाजपा पदाधिकारी, आमदार, खासदार, भाजपाचे मंत्री अन्य घटक पक्षांचे नेते तसेच मान्यवर नागरिक, संपादक अशांबरोबर त्यांच्या २९ विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जुळवाजुळव करण्यासाठी शाह यांचा हा दौरा नाही. भाजपाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विस्तारक योजनेसाठी ते देशातल्या सर्व राज्यांचा ९५ दिवसांचा दौरा करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून ते मुंबईत येत आहेत, असे दानवे म्हणाले.
शाह यांचे शुक्रवारी मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यावेळी पक्षाच्या वतीने मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. आगमनानंतर ते चैत्यभूमी, प्रस्तावित शिवस्मारक, सावरकर स्मारक तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळांना भेट देणार हेत. गरवारे क्लब येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील. या तीन दिवसात अमित शाह भाजपाच्या मंत्र्यांच्या कामाचाही आढावा घेतील. भाजपा सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांच्या नेत्यांशीही ते चर्चा करणार आहेत. संवाद यात्रा, तसेच ९० हजार बूथवर जाऊन केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम जनतेपर्यंत पोहचविणे, १५ हजार विस्तारक या महाराष्ट्र भाजपाच्या दोन मोठ्या कार्यक्रमांचा आढावाही ते घेतील. राज्यात झालेला शेतकऱ्यांचा संप आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी याची माहितीही ते घेण्याची शक्यता आहे. शनिवारी ते भाजपा खासदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतील. गेल्या तीन वर्षांतील खासदारांची कामगिरी आणि केंद्रातील सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यात ते कितपत यशस्वी झाले याचाही शाह आडावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील सरकार लवकरच तीन वर्षे पूर्ण करीत आहे. या तीन वर्षांत भाजपाच्या मंत्र्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी १८ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत राज्य मंत्रीमंडळातील भाजपाच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार असल्याचे कळते.