राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

0

नवी दिल्ली । राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने इतर पक्षांसोबत याच मुद्यावर चर्चा करण्यासाठी विशेष समितीची स्थापना केली आहे. राष्ट्रपतिपदासाठी आवश्यक झाल्यास 17 जुलै रोजी मतदान घेतले जाणार आहे. तसेच 20 जुलै रोजी मतमोजणी केली जाईल असे निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या समितीमध्ये राजनाथ सिंह, व्यंकैय्या नायडू आणि अरुण जेटली यांचा समावेश केला आहे.

सोनीया गांधीही लागल्या तयारीला
राष्ट्रपती निवडणुकीवर विरोधी पक्षांची बैठक 14 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जुलै महिन्यात होणार्‍या या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याची तयारी सुरू केली आहे. याच महिन्यात सोनिया गांधींनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे एक समूह तयार केले होते. हा समूह राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करणार आहे. विरोधी पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 14 जून रोजी होणार्‍या निवडणुकीनंतर विरोधी पक्ष एक मताने राष्ट्रपती आणि उप-राष्ट्रपतिपदासाठी उमेदवाराची घोषणा करू शकतात.

17 जूलैला होणार मतदान
निवडणूक आयोगाची सूचना – 14 जूनला होणार जारी, उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जून, उमेदवार अर्ज पडताळणी – 29 जून, उमेदवारी परत घेण्यासाठी शेवटची तारीख 1 जुलै, मतदान (आवश्यक झाल्यास) – 17 जुलै सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 पर्यंत, मतमोजणी (आवश्यक झाल्यास) – 20 जुलै सकाळी 11 पासून, असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

13 टक्के मते ठरवणार कोण होईल घटनात्मक प्रमुख
एनडीए सरकारला आपल्या पसंतीचे राष्ट्रपती निवडण्यासाठी केवळ 20 हजार मतांची आवश्यकता आहे. यासाठी संयुक्त लोकशाही आघाडीला बिगर यूपीए आणि बिगर एनडीए घटक पक्षांचा शोध घ्यावा लागणार आहे. या पक्षांचा मतांचा आकडा 13 टक्के आहे. हेच 13 टक्के राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल ठरवणार असे सांगितले जात आहे.