राष्ट्रपतीपदासाठी राजधानीत सुपरस्टार रजनीकांतच्या नावाची चर्चा

0

नवी दिल्ली । सध्या देशभरात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. लवकरच राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा कार्यकाल संपत आहे. त्यामुळे भारताचे पुढचे राष्ट्रपती कोण बनणार? याची देशभरात चर्चा सुरू आहे. अनेकजण या शर्यतीत आहेत. पण, अलिकडेच असं एक नाव समोर आले आहे की, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हे नाव आहे सुपरस्टार रजनीकांत यांचं. अनेक वेबसाईटनं याबाबत वृत्त दिले आहे.

सुपरस्टार रजनीकांत हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार अशी चर्चा आता राजकीय वतुर्ळात सुरू झाली आहे. राष्ट्रपतीपदासाठी सर्वसहमतीचे नाव केंद्र सरकार देईल अशी शक्यता असल्यामुळे दिल्लीत अनेक नावांची राष्ट्रपती पदासाठी चर्चा होऊ लागली आहे. राजकारणात येण्याबाबत सर्वात मोठा संकेत सुपरस्टार रजनीकांत यांनी दिला आहे. सिस्टिम सडली आहे, फार मोठ्या बदलाची गरज आहे. मोठ्या लढाईसाठी तयार राहा, असे सूचक वक्तव्य रजनीकांत यांनी केले होते. त्यांना जेव्हा राजकारणात येणार का? याबाबत विचारणा करण्यात आली होती, त्यावर ते काही बोलले नाहीत. त्यांनी आपल्या भाषणात द्रमुकचे नेते स्टॅलिन यांचेही कौतुक केले. त्यातच आता रजनीकांतच्या नावाचा राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत अचानकपणे समावेश झाला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने रजनीकांतच्या या नावाबाबत अधिकृत भाष्य केलेले नाही. पण रजनीकांत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह आहे. जुलै महिन्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा कार्यकाल संपत आहे. सर्वसहमतीने राष्ट्रपतीचा उमेदवार दिला जावा, यासाठी भाजप सध्या प्रयत्नशील आहे. तर रजनीकांत यांना राष्ट्रपती बनवून भाजप तामीळनाडूच्या राजकारणात शिरण्याचा प्रयत्न करत आहे, असं देखील म्हटलं जात आहे.