नवी दिल्ली । समाजवादी पार्टीतला गुहकलह संपण्याचे चिन्हे अजून तरी पहायला मिळत नाही. राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत एकीकडे पुत्र अखिलेश युपीएशी दोस्ताना करत असल्याचे पहायला मिळत असताना, दुसरीकडे जागतिक पितृदिनी मुलायमसिंग यादव यांनी मुलाच्या विरोधात जाऊन भाजपशी हातमिळवणी केली आहे. या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा करताना मुलायसमसिंग यांनी अखिलेश पार्टीला रसातळाला नेण्याचे काम करतोय असा शालजोडीतला हाणला आहे. याशिवाय योग्य उमेदवार असेल तर भाजपला पाठिंबा देणार असल्याची अटही मुलायमसिंग यांनी ठेवली आहे. कट्टर हिंदू नेत्याला उमेदवारी दिल्यास तर पाठिंबा नसेल असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि सूचना प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतल्यावर मुलायमसिंग यांनी भाजपला आपला सशर्त पाठिंबा जाहिर केला.
मुलाने डुबवली पार्टी
रक्त आटवून, मोठ्या मेहनतीने समाजवादी पार्टीला उत्तर प्रदेशात मोठे केले होते. पण काही खुशमस्करांच्या नादी लागून अखिलेशने पार्टीची वाट लावून टाकली. मुलायमसिंग म्हणाले की, काँग्रेसशी सलगी वाईट आहे. त्यांच्यापासून लांब रहा, असे अखिलेशला सांगितले होते. पण स्वत:ला थिंक टॅक समजणार्या एका नातेवाईकाच्या नादी लागून अखिलेशने केलेल्या चुकांमुळे पार्टीचे कमी आमदार निवडून आले.
भाजपच्या गोटात उत्साह
मुलायमसगि यांनी पाठिंबा जाहिर केल्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह निर्माण झाला आहे. समाजवादी पार्टीच्या खासदारांसह उत्तर प्रदेशातील 47 आमदारांची मते निश्चित झाल्याचे भाजपच्या नेत्यांना वाटते. समाजवादी पार्टीतले अनेक खासदार आणि आमदार अखिलेशसिंग यादव यांच्यासोबत दिसत असले तरी ते भावनिकदृष्ट्या मुलायमसिंग यादव यांच्यासोबत असल्याचा भाजपला विश्वास आहे.
मोहन भागवतांना विरोध
मुलायमसिंग यादव यांनी भाजपला पाठिंबा देताना मोहन भागवत यांचे नाव न घेता कट्टर हिंदुत्ववादी नेत्याच्या उमेदवारीला मान्यता देणार नसल्याचे स्पष्ट केले. यादव म्हणाले की, कट्टर हिंदूत्वादी नेत्याला देशाच्या सर्वोच्च पदावर बसवणे चुकीचे होईल. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे नाव पुढे केले आहे. नुकतीच मोहन भागवत यांनी मावळते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या नावाच्या चर्चेने वेगळे वळण घेतले होते.
सर्वसंमतीने निर्णय
मुलायमसिंग यांनी भाजपला पाठिंबा जाहिर करण्याच्या निर्णयाबाबत अखिलेशसिंग यादव यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. अखिलेश म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पार्टीचे सल्लागार, वरिष्ठ नेते, आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करुन सर्वसंमतीने अंतिम निर्णय घेण्यात येईल.