नवी दिल्ली । भारताचे 13 वे राष्ट्रपती निवडण्याच्या 2017 प्रक्रियेने वेग घेतला आहे. राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल, याबाबत 23 जून रोजी घोषणा होणार आहे. असे असले तरी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुषमा स्वराज राष्ट्रपतीपदासाठी उचित उमेदवार आहेत, असे एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही त्यांच्या नावाला पसंती आहे.
मुंबईतून 6 जणांचे उमेदवारी अर्ज
राष्ट्रपतीपदासाठी मुंबईतील सायरा बानो मोहम्मद पटेल आणि मोहम्मद पटेल अब्दुल हामिद या दाम्पत्यासह 6 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तामिळनाडूतील के. के. पद्मराजन, मध्य प्रदेशचे आनंद सिंह कुशवाहा, तेलंगणातील के. ए. बाला राज आणि पुण्यातील कोंडेकर विजय प्रकाश यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांना उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. भागवत यांना आपला पाठिंबा असेल, असे आधीच शिवसेनेने स्पष्ट केले आहे. पण राष्ट्रपतीपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे भागवत यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे 18 खासदार आणि 63 आमदारांचा या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा मिळेल, अशी भाजपला अपेक्षा आहे.
सहमतीसाठी दोन्ही बाजूंची मोर्चेबांधणी
या पदासाठी उमेदवाराच्या नावावर सहमती व्हावी यासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. एनडीएकडून 23 जूनलाच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राष्ट्रपती निवडणुकांसंदर्भात शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार आहे, असं समजतं. या बैठकीत सुषमा स्वराज यांच्या नावावर एकमतासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. भाजपचे वरिष्ठ नेते गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यात शुक्रवारी चर्चा होणार आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, सुषमा यांच्या नावाला तृणमूल काँग्रेसचे प्रमुख ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक यांसारख्या नेत्यांची पसंती आहे. यावर सध्या तरी परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.