मुंबई : राष्ट्रपति निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातुन विधानभवनात पोहचलेले छगन भुजबळ अॅम्बुलन्स मधुन उतरताच काहीसे भावनिक झाले. आधाराशीवाय चालु ही शकत नसलेल्या छगन भुजबळ यांना त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी आधार दिला होता. वाढलेली दाढी आणि खालावलेल्या प्रकृतीचा ताण भुजबळ यांच्या चेहर्यावर स्पष्ट जाणवत होता. दरम्यान भुजबळ यांना प्रसिध्दी माध्यमांशी बोलण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली नसतानाही भुजबळ यांनी मतदान करुन आल्यावर अत्यंत निवडक व्यक्तींसमोर आपल्या भावनांना वाट करुन दीली.
ज्या कंपन्यांमधे माझी भागीदारी असल्याचे सांगीतले जात आहे ते चुकीचे आहे, मला कॅन्सर सोडुन सगळे आजार आहेत, ह्या आजारातुन बरा झालो तर माझ्यावरील सगळ्या आरोपांना मी उत्तरे देईन,मी जिवंत असेपर्यत माझे निर्दोषत्व सिध्द व्हावे आणि इश्वराने मला तो पर्यत जीवंत ठेवावे अशा शब्दात भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाची बाब म्हणजे भुजबळ यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे डझनभर आमदार विधानभवनाच्या गेटवर उपस्थीत होते. अॅम्बुलन्समधून आलेल्या छगन भुजबळ यांची तब्बेत खालावल्याचे जाणवत होते. त्यांना आधार देण्यासाठी त्यांचे पुत्र, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नांदगावचे आमदार पंकज उपस्थीत होते. मतदान करण्यासाठी आलेले भुजबळ साधारण २ तास विधानभवनात होते. ते बराच वेळ विधानपरिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांच्या दालनात बसून होते. यादरम्यान त्यांनी काही राष्ट्रवादी आमदार व नेत्यांच्या भेटी घेतल्या. भुजबळांना विधानभवनातुन तुरुंगात नेले जात असताना त्यांच्या समर्थकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणा दिल्या .भुजबळांवर अन्याय होत असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
भुजबळ अॅम्बुलन्समधून
फ्रोझन शोल्डरचा त्रास असल्यामुळे तसेच वयोमानाने प्रकृती अस्वस्थ्यामुळे भुजबळाना अॅम्बुलन्समधून विधानभवनात घेऊन येण्यात आले होते. अॅम्बुलन्समधून आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अवस्था पाहून डोळ्यात अश्रू आले. त्यांच्याकडे बघून राजकारणात रहावे की नाही, असा विचार ही मनात आला अशी भावना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.