नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा लागू करण्याच्या बहुचर्चित कार्यक्रमावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. 30 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हा सोहळा पार पडणार असून, सोहळ्याचे उद्घाटन व कायदा लागू करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होत असल्याबद्दल काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असताना मोदींच्याहस्तेच उद्घाटन का, असा सवाल काँग्रेसने केला. तर केंद्र सरकारच्या या निर्णयाच्याविरोधात कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसच्यावतीने घेण्यात आला आहे. तशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. देशातील सर्वात मोठ्या करसुधारणेचे उद्घाटन मोदींच्या नव्हे तर राष्ट्रपतींच्याहस्ते व्हावे, अशी मागणी श्रीमती बॅनर्जी यांनी केली.
सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले, की राष्ट्रपती कार्यक्रमात प्रमुख अतिथी असताना पंतप्रधान जीएसटी लागू करण्याच्या सोहळ्याचे उद्घाटन कसे करू शकतात. ही बाब कदापिही सहन केली जाणार नाही. देशातील कोणताही नागरिक राष्ट्रपतींचा हा अपमान सहन करू शकणार नाही. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहांत आयोजित या सोहळ्याचे निमंत्रण संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना पाठवले आहे. त्यात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्याहस्ते जीएसटी लागू करण्याचा सोहळा पार पडेल, असे स्पष्टपणे नमूद आहे. भाजप सरकारच्या या निर्णयाचा ममता बॅनर्जी यांनी तीव्र निषेध केला असून, विरोध दर्शविण्यासाठी आपल्या पक्षाचे खासदार कार्यक्रमास जाणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावले आहे. जीएसटी काहीकाळ लांबणीवर टाकण्याची मागणीही त्यांच्या अर्थमंत्र्याने नुकतीच केली होती.
केवळ पाशवी बहुमत आहे म्हणून हे सरकार मनमानी करू शकत नाही. छोटे व्यापारी आणि अन्य घटकांना त्यांनी अव्हेरले असून, आता ते राष्ट्रपतींचाही अवमान करण्यास निघाले आहेत. सरकारच्या वागणुकीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.
– रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काँग्रेस
काँग्रेसची द्विधा मनस्थिती
या सोहळ्यासाठी भाजपने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रित केले असून, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह जनता दल (सेक्युलर)चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनाही आमंत्रित केले आहे. राष्ट्रपती व पंतप्रधानांसोबत हे नेते व्यासपीठावर बसणार आहेत. या समारंभात सहभागी व्हावे किंवा नाही याबाबत मात्र काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह दिसून आले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. तसेच, विरोधी पक्षांनीदेखील अद्याप आपला निर्णय जाहीर केला नव्हता.