राष्ट्रपती निवडणुकीचा केंद्रबिंदूही शरद पवारांकडे!

0

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्यावतीने राष्ट्रपती निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना, यूपीएचे घटक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांनाच यूपीएने पाठिंबा द्यावा, असा आग्रह धरला असल्याची माहिती दिल्लीस्थित वर्तुळातून देण्यात आली. यापूर्वी जनता दलाचे नेते तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही कोविंद यांना पाठिंबा दर्शविला आहे. पवारांशी चर्चा करून त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा तथा यूपीएच्या समन्वयक सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व अहमद पटेल यांना पवारांच्या निवासस्थानी पाठवले होते. चर्चेचा तपशील कळला नसला तरी, या नेत्यांनी पवारांची रणनीती जाणून घेतली असल्याची माहितीही सूत्राने दिली.

पवारांनी भूमिका बदलल्याचे यूपीएची गोची?
एनडीएकडून राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर यूपीएकडूनदेखील आपला स्वतंत्र उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरु झाली आहे. माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मनात घाटत आहे. त्यांना विरोधांपैकी बहुतांश पक्षाचे समर्थनदेखील आहे. तथापि, या निवडणुकीत सर्वसहमतीने उमेदवार देण्याची भूमिका घेणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र कोविंद यांच्या नावाला पसंती दिली आहे. अर्थात, तशी अधिकृत घोषणा त्यांनी अद्याप केली नाही. यूपीएनेदेखील स्वतंत्र उमेदवार न देता दलितनेते रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यावा, अशी पवारांची इच्छा आहे. तथापि, डाव्या पक्षांनी मात्र स्वतंत्र उमेदवार द्यावा, अशी मागणी रेटून धरली असून, त्या भूमिकेवर डावेनेते सीताराम येंचुरी कायम होते. तर काही नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नावदेखील या पदासाठी पुढे केले आहे. यूपीएत निर्माण झालेली मतभिन्नता लक्षात घेता, सोनिया गांधी यांनी आपले विश्वासू सहकारी गुलामनबी आझाद व अहमद पटेल यांना गुरुवारी शरद पवारांच्या निवासस्थानी चर्चेला पाठवले होते. तेथे उभयंतांत राजकीय रणनीती आखली गेल्याची चर्चा असून, संदर्भातील तपशील मात्र कळू शकला नाही.

काँग्रेस, डावे अन् पवारांचा सूर जुळेना!
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 16 राजकीय पक्ष एकवटलेले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा की स्वतंत्र उमेदवार उभा करायचा, याबाबत या पक्षाचे नेते विचारविनिमय करत आहेत. भाजपविरोधी पक्षांच्या या गटाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे असून, या निवडणुकीतील रणनीती सोनिया याच ठरविणार आहेत. तर भाजपविरोधी भूमिका घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससह बसपाप्रमुख मायावती यांनीही कोविंद यांच्या नावाला मात्र विरोध दर्शविलेला आहे. मीरा कुमार, सुशीलकुमार शिंदे किंवा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यापैकी एका नावासाठी यूपीए, डावे पक्षातील नेते आग्रही असून, ज्येष्ठ नेते शरद पवारांशी सल्लामसलत करूनच उमेदवार ठरविण्याची भूमिका सोनिया गांधी यांनी घेतली होती. त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली. तथापि, विरोधकांकडे पुरेशे मतदान नसताना एनडीएच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा, अशी भूमिका पवारांनी मांडल्याचेही राजकीय सूत्राने सांगितले.