मुंबई – भारताचे पुढचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील की मीरा कुमार हे ठरविण्यासाठी सोमवारी विधान भवनात मतदान होत आहे. सकाळी १० ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान होणार असून त्यात विधानसभेचे २८८ सदस्य भाग घेऊ शकतात. विधान परिशदेच्या सदस्यांना या निवडणुकीत मतदान करता येत नाही.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) वतीने लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्यात ही लढत होत आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी पाच, या वेळेत हे मतदान होईल. उद्याच सायंकाळी चोख बंदोबस्तात मतपेट्या दिल्लीला पाठवल्या जातील आणि 20 जुलैला संसदेत मतमोजणी होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी येत्या २४ जुलैला निवृत्त होत आहेत.
लोकसभेचे महासचिव डॉ. अनूप मिश्रा यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असून विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे सहाय्यक निर्वाचन अधिकारी आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य मतदार आहेत. त्यापैकी छगन भुजबळ आणि रमेश कदम तुरूंगात असून मतदानात भाग घेण्यासाठी त्यांना न्यायालयाने परवानगी दिली आहे. याआधी पप्पू कलानी व हितेंद्र ठाकूर हे आमदारही विधिमंडळात मतदानासाठी तुरूंगातून आले होते.
या निवडणुकीसाठी लोकसभा तसेच राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराचे ७०८ मूल्य गृहित धरण्यात आले असून राज्यातल्या प्रत्येक आमदाराचे मूल्य १७५ गृहित धरण्यात आले आहे. विधान परिषदेतल्या आमदारांना या निवडणुकीत मतदान करता येत नाही. राज्याच्या आमदारांना या निवडणुकीत दिल्लीत संसदेत जाऊन मतदान करता येते. तसेच खासदारांना राज्याच्या विधिमंडळात येऊन मतदान करता येते. मात्र त्याबाबतची पूर्वसूचना संबंधितांना मतदानाच्या 10 दिवस आधी द्यावी लागते. आपल्या विधिमंडळात अशी कोणा खासदाराची सूचना आलेली नाही. ही निवडणूक प्राधान्यक्रमाच्या मतदानाने होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतपत्रिकवेर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे पसंतीचा क्रमांक एक वा दोन द्यायचा आहे. हे मतदान गुप्त पद्धतीचे आहे.
पेनही विधानभवनाचेच
मतदानासाठी येणारे आमदार मोबाईल आणि पेन आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकणार नाहीत. मतदानाच्या वेळी लागणारे पेन निवडणूक आयोग उपलब्ध करून देईल. या पेनाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पेनचा मतपत्रिकेवर वापर केल्यास ते मत बाद ठरेल. गेल्या वर्षी हरीयाणाच्या राज्यसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या पेनऐवजी दुसरे पेन वापरल्याने काँग्रेसची 14 मते बाद ठरली होती.
सहा अपक्षांसह काही विरोधक कोविंदकडे
दरम्यान, अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपल्या संपर्कात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे डझनभर आमदार असल्याचे जाहीर केल्याने विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे. राज्यातले सहा अपक्ष आमदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनाच मतदान करणार असल्याचेही रवी राणा यांनी जाहीर केले. रामनाथ कोविंद यांच्या मुंबई भेटीत राणा या आमदारांच्या पाठिंब्याची ग्वाही देण्यासाठी बैठकस्थळी पोहोचले होते. भाजपाच्या गोटातून विरोधकांची जास्तीतजास्त मते फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.
भाजपाकडे 122 आणि शिवसेनेच्या 63 आमदारांची मते आहेत. त्यात या सहा अपक्षांचीही भर पडली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर इतर विरोधी पक्षांनी या निवडणुकीत यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादीचे 41, सीपीआई (एम), समाजवादी पार्टीचे एक-एक आणि पीडब्लूपीचे तीन आणि एमआयएमचे दोन आमदार मीरा कुमार यांच्याबरोबर आहेत.