राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत घेतली धाव

0

जळगाव। रिधून वाड्यातील बंगाली कारागिराच्या धरात घुसून चोरट्यांनी 2 किलो 111 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून नेले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, काही महिन्यानंतरच चोरट्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांनी तपास बंद केला होता. त्यामुळे पोलिसांकडून योग्यप्रकारे तपास झाला नसून आपल्यावर अन्याय होत असून न्याय मिळावा म्हणून तसेच स्थानिक पोलिस दखल घेत नसल्याने बंगाली कारागिर माहेती यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापर्यंत धाव घेतली. त्यात त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना या सर्व प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या विभागातून पत्र मिळाले आहे. यातच कारागिराने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने देखील गृहमंत्रालय, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक, पोलिस अधीक्षक आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षकांना नोटीस बजावली आहे. त्यात 13 एप्रिलपर्यंत न्यायालया खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अशी घडली होती घटना… रिधूर वाड्यात पुर्वी मराठा दरबार अगरबत्तीचा कारखाना असलेल्या ठिकाणी नगरसेवक कैलास सेानवणे यांनी दोन मजली इमारत बांधली आहे. त्यात दुसर्‍या मजल्यावर सोन्याचे दागिने घडविणारे बंगाली कारागिर राहतात. त्यातील ब्लॉक क्रमांक 6 मध्ये पुलक प्रधान यांच्या मालकीचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. 17 जून 2015 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पाच तरूण पुलक यांच्या दुकानात घुसले. त्या पैकी एकाने विचारले ‘गुरू भाईका दुकान कौनसा है ।’ बाजूला असल्याचे सागिंतले. तोपर्यंत एकाने दरवाचा बंद केला. त्यानंतर सर्वांनी मोठे सुरे काढून दुकानातील सपन प्रधान , सिंबास मांझी , शिवशंकर जाना , पसन्नजीत माहिती यांच्या मानेला लावले. त्यानंतर चौघांचे हात बांधून तोंडावर गम्प्लासच्या पट्ट्या चिटकविल्या. स्वयंपाक घराकडे जाण्यासाठी असलेला पडदा कापून त्याच्या छोटे तुकडे करून सर्वांच्या डोळ्यावर बांधले. त्यानंतर दुकानातील 750 ग्रॅम सोन घेतले. त्यानंतर बाजूला असलेल्या ब्लॉक क्रमांक 7 मध्ये गुरूदेव माहिती यांच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी ‘हम नाशिक इनकमटॅक्स डिपार्टमेंट से आये है।’ असे सांगून आत शिरले. त्यानंतर त्या ठिकाणी गुरुदेव माहिती, सोमेन पांजा , संजय मलिक , कुस्नुद मलिक , समीर कोटल, सुरजीत माहिती, संदीप सामंत यांना चाकूचा धाक दाखवून हात बांधून त्यांच्या दुकानातून 2 किलो 111 ग्रॅम सोने लुटून नेले होते.

शनिपेठ पोलिसांनी तपास केला होता बंद…
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सात महिने या गुन्ह्याचा तपास शनिपेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यामुळे 31 जानेवारी 2016 रोजी शनिपेठ पोलिसांनी आरोपींचा शोध न लागल्याने तपास बंद करण्यात येत असल्याचे पत्र फिर्यादी गुरूदेव रामपद माहेती यांना दिले.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे केली तक्रार
या प्रकरणी माहेती यांची स्थानिक पोलिस दखल घेत नसल्याचे त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापर्यंत धाव घेतली. त्यात 28 फेब्रुवारी 2017 रोजी त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना या सर्व प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून 20 फेब्रुवारी 2017 रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना, 14 मार्च, 28 मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्याच्या गृहमंत्रालयाला, तर राज्याच्या मुख्य सचिवांना 29 मार्च रोजी पत्र देण्यात आले.

पोलिसांनी केली शिवगाळ... या प्रकरणातील फिर्यादी गुरूदेव माहिती हे वेळोवेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जात होते. मात्र त्या ठिकाणी काही कर्मचार्‍यांनी त्यांना शिवगाळकरून हाकलून दिले. राष्ट्रपतींकडे जा नाही तर पंतप्रधांनांकडे जा आमचे कोणीच काही करू शकत नाही. अशा भाषेत धमक्या दिल्याचे माहिती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाटीस बजावल्या
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी 2 कोर्टात शनिपेठ पोलिसांनी 31 जानेवारी 2016 रोजी आरोपी सापडत नसल्याचा अहवाल पाठवून तपास बंद केला होता. याच्या विरोधात गुरूदेव माहेती यांनी 7 ऑक्टोबर 2016 रोजी औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती के. के. सोनवणे आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठात गृहमंत्रालय, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक, पोलिस अधीक्षक आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी 24 मार्च रोजी उच्च न्यायालयाने सर्वांना नोटीस पाठविली आहे. त्यात 13 एप्रिलपर्यंत सर्वांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना 13 तारखेपर्यंत याबाबत खुलासा सादर करावा लागला आहे. दरम्यान, न्याय मिळावा अशी अपेक्षा कारागिराने व्यक्त केली आहे.