मुंबई । देशाच्या राष्ट्रपतींनी कार्यक्रमाला येणे हा महापालिकेसाठी गौरवाचा क्षण असतो. नागपूर महापालिकेच्या इतिहासात आजवर तीनदा अशा गौरवशाली क्षणांची नोंद झाली आहे. यात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. शंकरदयाल शर्मा व प्रणव मुखर्जी आदींचा समावेश आहे. सुरेश भट सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने 22 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला येणारे रामनाथ कोविंद हे चौथे राष्ट्रपती ठरणार आहेत.
यापुर्वी तीन राष्ट्रपती नापुरात
नागपूर महापालिकेने 151 वर्षे पूर्ण केली आहेत़ कधी काळी 1 लाख 60 हजार रुपये उत्पन्न असणार्या महापालिकेचा अर्थसंकल्प आता अडीच हजार कोटींवर गेला आहे. 1964 साली महापालिकेला शंभर वर्षे पूर्ण झाली होती़ त्यानिमित्ताने आयोजित शताब्दी महोत्सवाला त्यावेळचे राष्ट्रपती डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते़ महापालिकेच्या शताब्दी ग्रंथाचे त्यांनी प्रकाशन केले होते़ त्यानंतर 9 डिसेंबर 1995 रोजी सतरंजीपुरा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा उपस्थित होते़ 14 सप्टेंबर 2015 रोजी महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले हाते. मानकापूर येथील क्रीडा संकुलात हा देखणा सोहळा पार पडला़ आता 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भट सभागृहाचे लोकार्पण होत आहे. महापालिकेच्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे कोविंद हे चौथे राष्ट्रपती असतील़ महापालिका प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे.महापालिकेच्या इतिहासात अनेक मान्यवरांचा महापालिकेने गौरव केला आहे़ 22 डिसेंबर 1926 रोजी महात्मा गांधी यांना नागपूर नगरपालिकेतर्फे मानपत्र अर्पण करण्यात आले होते़