राष्ट्रवादीकडुन रॅली तर भाजपाही करणार शक्तिप्रदर्शन

0

खा. रक्षा खडसे, गुलाबराव देवकर, आ. स्मिता वाघ आज अर्ज भरणार

जळगाव – लोकसभा निवडणुकीसाठी उद्या दि. २८ पासून नामनिर्देशन पत्र भरण्याला सुरवात होणार असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपासह राष्ट्रवादीने उद्याचाच मुहुर्त निश्‍चीत केला असल्याने उमेदवारी अर्जासाठी राष्ट्रवादीने रॅलीचे आयोजन केले असुन भाजपाकडुनही शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने उद्या दि. २८ पासून सुरवात होत आहे. उद्या २८ पासून जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीने जय्यत तयारी केली आहे. प्रचारसभा, बैठका, रॅली यासाठी देखिल राजकीय पक्षांनी नियोजन केले आहे. स्टार प्रचारकांच्या दौर्‍यांचीही आखणी करण्यात आली असुन जिल्ह्यात केंद्र आणि राज्यस्तरावरील नेते हे स्टार प्रचारकाच्या भूमिकेत प्रचारासाठी येणार आहेत.

भाजपाचे शक्तिप्रदर्शन
जळगाव जिल्हा हा भाजपाचा गड मानला जातो. गत २० वर्षापासुन जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवर भाजपाचे वर्चस्व राहीले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपाने मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने भाजपाला पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. उद्या दि. २८ रोजी भाजपाच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार आ. स्मिता वाघ व रावेर लोकसभेच्या खा. रक्षा खडसे हे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. स. १० वा. सागर पार्क येथुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघणार आहे. यावेळी ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, माजी आ. सुरेशदादा जैन, ना. गुलाबराव पाटील, आ. राजुमामा भोळे, महापौर सीमा भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. संजय सावकारे, आ. हरीभाऊ जावळे, आ. उन्मेष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, ना. उज्वला पाटील, माजी आ. चिमणराव पाटी, माजी आ. कैलास पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आरपीआयचे रमेश मकासरे, उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे,अ‍ॅड. किशोर काळकर, यांच्यासह भाजपा, रिपाइं, शिवसेनेचे पदाधिकारी देखिल सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादीतर्फे रॅली
राष्ट्रवादीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या दि. २८ रोजी स. १०.१० वा. शिवतीर्थ मैदानावरून रॅली काढण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा जिल्ह्याचे प्रभारी आ. दिलीप वळसे-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

उमेदवारासह पाच जणांना प्रवेश
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार्‍या उमेदवारासह केवळ पाच जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या पार्श्‍वभूमीवर पुरेसा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. तसेच १०० मीटर परीसरात वाहनांना बंदी राहणार आहे. जळगाव लोकसभेसाठी जिल्हा निवडणुक निर्णयाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व रावेर लोकसभेसाठी गोरक्ष गाडीलकर हे निवडणुक निर्णयाधिकारी आहेत.

प्रशासनाकडुन एक खिडकी योजना
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता विविध राजकीय पक्षांना/उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या/परवाने घ्यावे लागतात. या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहिरसभा, खाजगी जागेवर जाहिरात फलक लावणे याकरीता उपआयुक्त महानगरपालिका/ मुख्याधिकारी नगर परिषद/ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची परवानगी घेणे आवश्यक असून अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, फलक लावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या या एक खिडकी योजनेमार्फत दिल्या जाणार आहेत.

उमेदवारीसाठी २५ हजार रूपये अनामत
उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५ हजार रूपये अनामत रक्कम निश्‍चीत करण्यात आली आहे. तर इतर आरक्षित उमेदवारासाठी ही रक्कम निम्मे राहणार आहे.