राष्ट्रवादीकडून भाजप कार्यकर्त्यावर हल्ला

0

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाने महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच नाकात दम आणल्याने बिथरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आता गुंडगिरीचा आधार घेतला असल्याचे दिसून येऊ लागले आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये संजय हिरामण लंगोटे यांच्यासह त्यांच्या एका मित्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काळूराम पवार, त्यांचे बंधू बाळू पवार व किरण तेलंग यांनी खुनी हल्ला केला. ही घटना रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आनंद नगर येथे घडली. या घटनेची माहिती भाजपचे उमेदवार शैलेश मोरे यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेने परिसरात एकच दहशत निर्माण झाली होती. गंभीर जखमी झालेल्या संजय लंगोटे यांच्यासह त्यांच्या मित्राला तातडीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. दोन्ही बाजूंनीही परस्परविरोधी फिर्यादी चिंचवड पोलिस ठाण्यात दाखल झाल्या असून, पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

लाकडी दांडके, दगडांनी मारहाण, जखमी घटनास्थळी बराचवेळ पडून

विजयनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर प्रभाग क्रमांक 19 भाजपचे उमेदवार शैलेश प्रकाश मोरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार काळूराम मारुती पवार हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. शनिवारी रात्री या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पैसे वाटत असल्याची माहिती भाजपचे उमेदवार शैलेश मोरे यांना मिळाली. त्यानुसार मोरे यांचे काही कार्यकर्ते या भागात गेले असता, तेथे असलेल्या काळूराम पवार व त्यांच्या बंधुंसह इतर 50 ते 60 जणांच्या जमावाने या कार्यकर्त्यांवर लाकडी दांडके, दगड व इतर साहित्याने हल्ला चढविला. त्यावेळी जमावाच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न करताना संजय लंगोटे व त्याचा एक मित्र तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती होताच शैलेश मोरे व आणखी भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन गंभीर जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. लंगोटे याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, 13 टाके पडले आहेत. सद्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेमुळे परिसरात एकच दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी या भागात कडेकोट बंदोबस्त वाढविला होता. रात्री उशिरा याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून,राष्ट्रवादीचे काळूराम पवार यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि भाजपचे उमेदवाराविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जखमी संजय लंगोटे यांची फिर्याद

गंभीर जखमी झालेले संजय हिरामण लंगोटे (वय 37, रा. गवळीचाळ, मोहननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काळूराम पवार, बाळू पवार, किरण तेलंग यांच्यासह काही जण शनिवारी रात्री आनंदनगर येथे मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही तिथे गेलो होतो. त्यावेळी काळूराम पवार, बाळू पवार, किरण तेलंगे यांनी फिर्यादी लंगोटे हे शैलेश मोरे यांचे कार्यकर्ते असून, त्याच्या प्रचारार्थ फिरत असल्याचे पाहून चिडून लंगोटे याला शिवीगाळ केली. तसेच लंगोटे याच्या डोक्यात दांडुके व दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, मनिषा काळूराम पवार यांच्या फिर्यादीवरून भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोशी-चर्‍हालीत शैला मोळकांवर भानामती!

मोशी-चर्‍होली प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपच्या उमेदवार शैला मोळक निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काळ्या जादूचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यांच्या घरात तसेच, ज्या ठिकाणी त्यांनी बूथ लावण्याचे नियोजन केले आहे. त्या ठिकाणी काळ्या बाहुल्या टाकण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या काळ्या जादूच्या प्रयोगामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या काळ्या बाहुल्यांना शैला मोळक यांचे नाव लिहून चिठ्ठी चिकटण्यात आली असून, त्याला टाचण्या टोचण्यात आल्या आहेत. तसेच, लिंबू, हळद-कुंकू आदी साहित्य टाकण्यात आल्याचे दिसून आले. मोळक या भाजपच्या पिंपरी-चिंचवड महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आहेत. सुरुवातीला त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे मोळक समर्थकांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात निदर्शने केली होती. मात्र, नंतर त्यांना तिकीट देण्यात आले.

मोहनगरमध्ये पैसे वाटणार्‍या चौघांवर गुन्हे

मतदारांची यादी व मतदान ओळखपत्राच्या झेरॉक्स हातामध्ये घेऊन मतदारांना पैसे वाटणार्‍या चौघांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री मोहननगर येथे करण्यात आली. भगवान सदाशिव नामदे (वय 38, मोहननगर, चिंचवड), दादा पाटील (वय 45, रा. रामनगर, चिंचवड) व आणखी दोन साथीदारांवर कलम 171 (ब), 171 (ई) 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजू बापू वेताळ (वय 48, रा. वाकड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेताळ हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत. प्रभाग क्रमांक 14 येथील मातृ-छाया निवासमध्ये शनिवारी सायंकाळी नामदे व पाटील पैसे वाटत असल्याची माहिती वेताळ यांना मिळाली. त्यानुसार वेताळ आणि पोलिस घटनास्थळी गेले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता भांड्याच्या किचन ट्रॉलीमध्ये दोन हजार रुपयांच्या 72 नोटा, पाचशेची एक नोट असे एक लाख 44 हजार 500 रुपयांची रोकड सापडली. तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील काही मतदारांची यादी व मतदान ओळखपत्राच्या झेरॉक्स, प्रभाग 10 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे प्रचारपत्रक आणि प्रभाग 14 मधील भाजपच्या उमेदवाराची प्रचारपत्रके मिळून आली आहेत. पिंपरी ठाण्याचे फौजदार एच. एस. बोचरे तपास करत आहेत.