मुंबई- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात शेतकरी, ग्रामविकास, शिक्षण आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्याद्वारे दिले आहे.
राष्ट्रवादीने अल्पसंख्याक समाजासाठीही काही योजना जाहीर केल्या आहेत. केंद्राने तिहेरी तलाकचा अध्यादेश काढला आहे तो अध्यादेश राष्ट्रवादी सत्तेत आल्यास रद्द केला जाईल असे जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. अल्पसंख्याक समुदायाला विश्वासात न घेता हे अध्यादेश काढण्यात आले आहे असे आरोप यावेळी करण्यात आले. तसेच अल्पसंख्यांक मुलींच्या शिक्षणासाठी छोट्या, मोठ्या शहरांमध्ये वसतिगृह उभारणार, अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे यासाठी दहावी, बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींच्या कुटुंबीयांना विशेष लाभ देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कमी पाऊस पडणाऱ्या भागात शेतीसाठी ‘सिटू मॉइश्चर’ पद्धती, जलसंवर्धन आणि सिंचनाची क्षमता वाढवणे आणि पाण्याचा सुयोग्य वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी नव्या शेती पद्धती निर्माण करण्यासाठी विशेष योजना राबवल्या जातील. तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असे राष्ट्रवादीने सांगितले आहे.