राष्ट्रवादीचा नागपूर अधिवेशनात महामोर्चा

0

इंदापूर । सरकारच्या कामचलाऊ धोरणामुळे शेतकरी व सर्वसामान्य पुरता वैतागून गेला असून, शेतकरीविरोधी धोरण राबवून शासन मागील तीन वर्षांपासून जनतेची फसवणूक करत असून वृृत्तपत्रात जाहिरातीद्वारे विकासाचा कांगावा करणार्‍या भाजप व शिवसेना सरकार विरोधात सोमवारी इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांचे नेतृृत्वाखाली नगरपरिषद मैदान ते तहसील कचेरीपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढून मोर्चाचे तहसील कार्यालय आवारात सभेत रूपांतर झाले.

सरकारचा निषेध करून दि. 23 ते 29 नोहेंबरपर्यंत पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर हल्लाबोल आंदोलन करणार असून 12 डिसेंबर शरद पवारांच्या वाढदिवशी नागपूर अधिवेशनात विराट मोर्चा काढून सरकारच्या कुचकामी व शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करणार असल्याची माहिती आमदार भरणे यांनी निषेध सभेत दिली. यावेळी प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे, महारूद्र पाटील, प्रवीण माने यांचीही भाषणे झाली. बुलेट ट्रेनवर करोडो रुपये खर्च करून किती लोकांना भविष्यात याचा फायदा होणार याची माहिती नाही, परंतु शेतकर्‍यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम मागील तीन वर्षांत सरकारने केल्याने सत्तेत राहण्याचा हक्क या सरकारला नसल्याने नागपूर अधिवेशनादरम्यान 12 तारखेला लाखो कार्यकर्ते व शेतकर्‍यांच्या महामोर्चाचे आयोजन केल्याचे भरणे म्हणाले.यावेळी अमोल भिसे, गजानग गवळी, पोपट शिंदे, नगरसेवक अमर गाडे नगरसेवक स्वप्निल राऊत, अनिकेत वाघ, विठ्ठल ननवरे, बाळासाहेब ढवळे, पै.बजरंग राऊत, रमेश शिंदे यांच्या शिष्टमंडळाने तहसिलदार श्रीकांत पाटील यांना मोर्चाच्यावतीने सरकारचा निषेध करणारे निवेदन देण्यात आले.

दौंड तहसील कार्यालयावरही हल्लाबोल
यवत । खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. 27) दौंड येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढत हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न उपस्थित करून सरकारवर एकच हल्लाबोल केला. राज्यातील रस्त्यांच्या झालेल्या बिकट अवस्थेबाबत राज्यातील रस्ते सरकारने 15 डिसेंबरपर्यंत दुरुस्त केल्यास मी सरकारचे स्वागत करीन असे सुळे यावेळी म्हणाल्या.

यावेळी सुळे म्हणाल्या की, अमरावतीमधील डिजिटल गावाचा केलेला दावा खोटा असून जर सरकारच खोटे बोलत असेल तर दाद कोणाकडे मागायचा असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. प्रलंबित कुरकुंभ मोरीविषयी त्या म्हणाल्या, मोदी, फडणवीस सरकार असेपर्यंत कुरकुंभ मोरीचा प्रश्‍न सुटणार नाही. रमेश थोरात, वैशाली नागवडे, जालिंदर कामठे, अप्पासाहेब पवार, विकास खळदकर, वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादीचे नगरसेवक, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले.