सभागृहात सत्ताधारी भाजपाकडून विरोधकांना बोलू दिले नसल्याचा आक्षेप
विरोधी पक्षनेत्यांनी आणलेला खासगी ध्वनीक्षेपक काढला सभागृहाबाहेर
पिंपरी-चिंचवड :महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भाजपकडून विरोधकांचा आवाज दाबला जातोय असा सतत आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत स्वतःचा खाजगी ध्वनीक्षेपक नगरसेविकेकडून आणण्यात आला. मात्र, महापौर नितीन काळजे यांनी हा ध्वनीक्षेपक सभागृहात ठेवण्यास विरोध दर्शविला. दरम्यान, सुरुवातीला साने यांनी नकार दिला, परंतू, महापौर विनंतीवजा आदेश देताच तो बाहेर काढण्यात आला. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठीचा राष्ट्रवादीचा स्टंटच ठरला. तसेच त्यांचा हा नियमबाह्य आवाज निघालाच नाही.
महापौराचा विनंतीवजा आदेश
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपाची सत्ता आणली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले. तेव्हापासून महापालिका सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर पर्याय म्हणून साने यांनी राष्ट्रवादीचा ‘आवाज’ सभागृहात घुमवण्यासाठी स्वत:चा ध्वनीक्षेपक बंद बॅगमधून सभागृहात आणला होता. त्याला महापौर नितीन काळजे यांनी विरोध दर्शविला.
पुन्हा ‘आवाज’ आणणारच
यावेळी दत्ता साने म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात गेल्या वर्षभरात विरोधकांना अनेक चांगले-वाईट अनुभव आलेत. विरोधी पक्षातील नगरसेवकांना जाणिवपूर्वक बोलू दिले जात नाही. सत्ताधारी आमचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आम्ही स्वतंत्र स्पिकर सभागृहात आणला आहे. गरज पडेल तेव्हा आम्ही या स्पिकरचा वापर करू.
उद्या दुचाकी आणाल : महापौर
महापौर काळजे म्हणाले, सभागृहात स्पिकर आणणे हे नियमबाह्य आहे. कुणाचाही आवाज आम्ही दाबत नाही. सभागृहात सर्वांना बोलू दिले जाते. उद्या एखादा नगरसेवक टु व्हिलर घेऊन सभागृहात येईल. त्यामुळे साने यांनी तो स्पिकर सभागृहातून बाहेर पाठवावा. अखेरीस साने यांनी तो स्पिकर सभागृहातून बाहेर पाठवला.