शिरूर । शिरूर तालुक्यातील पाबळ आणि परिसरातील गावांमध्ये दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा खंडित होऊन कमी व उच्च दाबाने वीज येत असल्याने अनेक घरांतील फ्रिज, दूरचित्रवाणी संच, मिक्सर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी झाली आहेत. येत्या दोन दिवसांत महावितरणने याबाबत दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पाबळ, धामारी, खैरेनगर, पिंपळवाडी, थापेवाडी, पाबळ आणि परिसरातील अनेक गावांना पाबळ येथील उपकेंद्रातून वीज मिळते. परंतु, मागणी जास्त व कमी क्षमतेचे ट्रान्सफार्मर असल्याने व विद्युतवाहक तारा कुजल्याने या भागातील गावांमध्ये वारंवार वीज खंडित होते. तारा विजेचा दाब पेलू न शकल्याने दर 15 मिनिटांनी येथील वीजपुरवाठा खंडित होतो. या दरम्यान आलेली वीज कमी किंवा अतिउच्च दाबाची असल्याने घरातील इलेक्ट्रीक साहित्य जळून जात आहेत. त्यामुळे ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष सचिन चौधरी, दिलीप घाटकर, अमोल जाधव, सुरेश रायकर यांनी महावितरण टीका करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.