मुंबई: महाविकास आघाडीचे खातेवाटप सहा दिवसानंतर झाले. अधिकृत यादी जाहीर करण्यात अली आहे. या खातेवाटपात महत्त्वाची खाती मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. विशेषबाब म्हणजे संपूर्ण राज्याचे जेवढे बजेट आहे, त्याच्या निम्म्या बजेटची खाती एकट्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत.
राष्ट्रवादीच्या वाट्याला अर्थ व नियोजन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, जलसंपदा व लाभक्षेत्र, गृह, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, ग्राम विकास, अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास आणि उद्योजकता, गृहनिर्माण, सहकार व पणन आणि सामाजिक न्याय व विशेष विभाग आला आहे.
राज्याचे वार्षिक बजेट सुमारे २ लाख ५० हजार कोटी असून राष्ट्रवादीकडील खात्यांचे बजेट १ लाख २० हजार कोटी इतके आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची खाती मिळवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीकडे आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे बजेट ४५०० कोटी, सार्वजनिक आरोग्य खात्याचं बजेट १२००० कोटी, गृहनिर्माण खाते १४०० कोटी, सामाजिक न्याय १३००० कोटी, अन्न व नागरी पुरवठा १०००० कोटी, ग्रामविकास १८००० कोटी, गृह २३००० कोटी, जलसंपदा १६००० कोटी, उत्पादन शुल्क २०० कोटी आणि अर्थ खात्याचं बजेट ९१००० कोटी असल्याचे बोलले जात आहे.