नांदेड । महाराष्ट्रात सर्व ठिकाणी काँग्रेसबरोबर आघाडी केली जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रविवारी जाहीर केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये युती करण्यासाठी ते अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आले होते. पवारांची चव्हाणांशी नांदेडमध्ये झालेली भेट पाहून अनेक राजकीय चाणक्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या भेटीत कोणती रणनीती ठरली?, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधीमंडळात अविश्वास ठराव मांडणार की त्या आधीच शिवसेनेशी सल्लामसलत करून काही वेगळी भूमिका घेणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील जिल्हापरिषदांमध्ये आघाडीसाठी शरद पवारांनी काँग्रेसबरोबरच्या आघाडीला संमती दर्शवली आहे. यामुळे राज्यातील 18 ते 19 जिल्हापरिषदांमध्ये आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. मुंबईतील काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार यावर बोलताना ते म्हणाले की, मुंबईबाबतचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील. मात्र, मुंबईबाबत काँग्रेसचे काय धोरण आहे माहीत नाही, असे ते म्हणाले.
निवडणुकीला सामोरे जाऊ
भाजप-शिवसेना युती तुटल्यामुळे राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय असू शकता, पण सत्ता सर्वांना प्रिय आहे, निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेनं तोडलेली युती पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकाचा प्रश्नच नाही. जर शिवसेनेने सत्ता सोडली तर आम्ही राज्यात कोणालाही पाठिंबा देणार नाही, तर निवडणुकीला सामोरे जाऊ.
– शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते