राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरेंच्या घरावर प्राप्तिकरचा छापा

0

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या बाणेरमधील वीरभद्र नगर येथील दत्तकृपा निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास छापा टाकला. साध्या वेशात व खाजगी गाड्यांतून आलेल्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी व पोलिसांनी ताबडतोब घराचा ताबा घेऊन सुरक्षाव्यवस्थेत तपासणीला सुरूवात केली. सुमारे बारा जणांच्या पथकाने ही कारवाई केली. सकाळी सुरू झालेली तपासणी उशिरापर्यंत सुरू होती. मुलाच्या लग्नातील कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच केलेले हल्लाबोल आंदोलन याचाच फटका चांदेरे यांना बसल्याची चर्चा दिवसभर पुण्यात दबक्या आवाजात सुरू होती.

मुलाच्या लग्नात कोट्यवधींचा खर्च
बाबूराव चांदेरे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून, शरद पवार, अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. बाणेर गावाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर हा भाग त्यांचा बालेकिल्ला बनला. महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे. आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले असून, त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. त्यांच्या काही नातेवाइकांकडेही प्राप्तिकर खात्याने चौकशी सुरू कली असल्याची माहिती मिळाली आहे. चांदेरेंच्या घरी पडलेल्या या छाप्यातून बरेच मोठे घबाड प्राप्तिकरच्या हाती लागल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

राजकीय वर्तुळात खळबळ
मंगळवारी सकाळी साध्या वेशातील प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. 50 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सकाळी साडेसहा वाजताच चांदेरे यांच्या बाणेर परिसरातील घरी धडकले. आल्यानंतर त्यांनी चांदेरे यांना त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे दाखवली व घराची तपासणी करायची आहे असे सांगितले. चांदेरे यांनी त्यांच्याशी बोलणे सुरू करताच अधिकार्‍यांनी काही ऐकण्यास नकार दिला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, असे सांगितले व तपासणी करताना सहकार्य करा, असे बजावले. दुपारी उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. या दरम्यान कोणालाही बाहेर जाऊ देण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चांदेरे यांच्यावर नेमकी कोणत्या कारणासाठी प्राप्तिकर विभागाने कारवाई केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. काही जणांनी याचा संदर्भ चांदेरे यांच्या मुलाच्या अलीकडेच झालेल्या शाहीविवाह सोहळ्याशी जोडला आहे. त्यावेळी चांदेरे यांनी केलेल्या अफाट खर्चामुळेच ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे.