रावेरातुन खा. रक्षा खडसे तर जळगावातुन गुलाबराव देवकरांचा अर्ज दाखल
जळगाव – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढुन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेना नेते माजी आ. आर.ओ. पाटील यांचे निधन झाल्यामुळे भाजपाने कार्यक्रम रद्द करून केवळ मेळावा घेत ताकद दाखविली.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आजपासुन सुरवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहीलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
राष्ट्रवादीतर्फे रॅली
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभेचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवतीर्थ मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. या सभेसाठी जिल्ह्याचे प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे-पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, आ. डॉ. सतीश पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे, माजी खा. अॅड. वसंतराव मोरे, माजी आ. अरूणभाई गुजराथी, माजी आ.दिलीप वाघ, माजी आ. राजीव देशमुख, माजी आ. दिलीप सोनवणे, माजी आ. अरूण पाटील, अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, विलास पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अरविंद मानकरी, विलास पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, माजी आ. निळकंठ फालक, मंगला पाटील, सविता बोरसे, प्रतिभा शिरसाठ, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदी सरकारला खाची खेचा – आ. दिलीप-वळसे पाटील
लोकसभेची निवडणुक ही केवळ खासदारकीची निवडणुक नाही. तर देशातील सरकार निवडण्याची ही निवडणुक आहे. गेल्या पाच वर्षापुर्वी नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखविली. ही स्वप्ने मात्र काही पुर्ण झाली नाही. जनतेची मोदींनी फसवणूक केली असुन देशातील मोदींचे रसाकर खाली खेचा असे आवाहन जिल्ह्याचे प्रभारी आ. दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
सभेनंतर राष्ट्रवादीची रॅली
सभेनंतर शिवतीर्थ मैदानापासुन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने रॅली काढुन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप झाला.
देवकरांनी साधला मुहूर्त
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातुन दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. देवकरांच्या अर्जावर सुचक म्हणुन शहराध्यक्ष नामदेव चौधरी व मोहन यादव पाटील यांचे नाव आहे. अर्ज भरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपाइं (कवाडे गट)चे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाची मेळाव्यातुन ताकद
भारतीय जनता पार्टीतर्फे जळगाव लोकसभेच्या उमेदवार आ. स्मिता वाघ आणि रावेर लोकसभेच्या उमेदवार खा. रक्षा खडसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नियोजन करण्यात करण्यात आले होते. त्यासाठी सागर पार्क मैदानावर भाजपा-शिवसेना, रिपाइं (आ) महायुतीचा मेळावा देखिल आयोजीत करण्यात आल होता. मात्र शिवसेनेचे माजी आ. आर.ओ.पाटील यांचे निधन झाल्याने भाजपाने रॅलीचा कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर भाजपाने पदाधिकारी वाहनाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. याठिकाणी रावेर लोकसभा मतदारसंघातुन खा. रक्षा खडसे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. खा. रक्षा खडसे यांना आ. चैनसुख संचेती व आ. हरीभाऊ जावळे हे सुचक आहेत. यावेळी ना. गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चैनसुख संचेती, आ. स्मिता वाघ, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहीणी खडसे-खेवलकर, नगरसेविका उज्वला बेंडाळे, योगेश कोलते, चेतन शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा-शिवसेना-रिपाइं महायुतीचा मेळावा सागरपार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्यातुन महायुतीनेही ताकद दाखविली.
भाजपाशी ‘लव्ह मॅरेज’ – ना. गुलाबराव पाटील
महायुतीच्या मेळाव्यात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जि.प., मनपा, नगरपालिकेच्या निवडणूका या कार्यकर्त्यांचा निवडणूका असतात. हा तोच कार्यकर्ता असतो की जो भाजपाला लोकसभेच्या वेळेस मदत करतो. मात्र, त्यांच्या निवडणुकांचे लग्न जवळ आले की भाजपाकडून लगेच फारकत घेतली जाते. भाजपाशी ‘लव्ह मॅरेज’ झाले आहे. तर हे लव्ह मॅरेज कायमस्वरुपती टिकवा असेही गुलाबराव पाटील म्हणाले. जि.प.मध्ये कॉँग्रेसला जवळ केले आहे. कॉँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचा मुलगा पक्षात घेतला तसेच शिवसेनेलाही जवळ घ्या असेही गुलाबराव पाटील म्हणाले. भाजपाशी युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली असून, ती कायम रहावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, भाजपाकेवळ लोकसभेच्या वेळेस शिवसेनेची मदत घेवून घेते. तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या वेळेस मात्र शिवसेनेला दुर ठेवून सत्ता मिळवली जाते. आता जशी आमची मदत घेतात, तशी मदत इतर निवडणुकीत आमचीही करा असा टोला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला लगावला.