राष्ट्रवादीचे सात आमदार पुन्हा पक्षात परतले; ट्वीट करून दिली माहिती !

0

मुंबई: आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच चर्चा सुरु आहे. दरम्यान अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाची कल्पना खुद्द शरद पवारांना नव्हती. त्यामुळे त्यांनी अजित पवारांचा निर्णय हा स्वत:चा निर्णय आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगत, सर्व आमदार पक्षासोबत असल्याचे सांगितले होते. दरम्यान आता राष्ट्रवादीचे अजित पवारांसोबत गेलेले आमदार परत पक्षात आले आहे. स्वत: आमदारांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ११ पैकी ७ आमदार परत आले आहे. आमदार दिलीप बनकर आणि माणिकराव कोकाटे यांनी ट्वीट करून आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत, शरद पवारांसोबत आहोत असे सांगितले आहे.

आम्हाला राजभवनात फक्त येण्याबाबत सांगण्यात आले होते, काय होत आहे याबाबत काहीही सांगितले नव्हते असे आमदारांनी सांगितले आहे. अजित पवारांनी आपला निर्णय बदलावा यासाठी काही नेते अजित पवारांना भेटायला देखील गेले आहे. अजित पवारांची मनधरणी करण्यात त्यांना यश येते का? हे येत्या काळात समजेल.