नाशिकमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा
मुंबई :- विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हल्लाबोल आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा उत्तर महाराष्ट्रातील समारोप सभा १० मार्चला नाशिक येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ डिसेंबर २०१७ पासून संपूर्ण राज्यभर सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. विदर्भ, मराठवाडयामध्ये जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद आंदोलनाला मिळाला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात १० दिवस २१ सभा घेत हल्लाबोल आंदोलनाची तीव्रता सरकारच्याविरोधात वाढवण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची सांगता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर १० मार्चला दुपारी ४ वाजता जाहीर सभेने होणार आहे.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारविरोधी वातावरण निर्माण केल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातही हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर कोकणातही हल्लाबोल आंदोलन होणार आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता जाहीर सभेला अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींसह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.