नवी मुंबई । नेरुळमधील नगरसेविका श्रद्धा गवस यांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू असतांनाच विभागातील कार्यकर्ते श्री निवास मोगविरा यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. त्यात श्री निवास गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व गालाला एकूण आठ टाके पडले आहेत. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून भावेश शंकर पणीकर असे त्याचे नाव आहे.अन्य एका आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली. विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात माजी मंत्री गणेश नाईक, महापौर जयवंत सुतार व अन्य मान्यवर उपस्थित राहणार होते. त्याच वेळी कार्यक्रम स्थळाजवळच उभे असलेले आरोपी शिवीगाळ करत होते.
हल्ल्याचा भूमिपूजनाशी संबंध नाही आरोपी नशेत
नगरसेवक श्रद्धा गवस यांचे पती साधुराम गवस यांनी त्यांना जाब विचारला असता, दोन आरोपींमधील एकाने साधुराम यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमावाने त्यांना हुसकावून लावले. तरीही त्यांनी शिवीगाळ सुरूच ठेवली. याबाबत श्रीनिवास मोगविरा यांनी विचारणा केली असता त्यातील एकाने मोगविरा यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. जमावाने भावेश शंकर पणीकर याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा दुसरा मित्र दुचाकीवरून पळून गेला. गंभीर जखमी असलेल्या मोगविरा यांच्यावर वाशी मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.त्याचवेळी नगरसेविकेच्या पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून एकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपास करून पसार झालेल्या आरोपीला अटक करावी, अशी मागणी यावेळी परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी पोलिसांकडे केली आहे. हल्ल्याचा भूमिपूजनाशी संबंध नाही आरोपी दारूच्या नशेत होता. त्याच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी स्पष्ट केले.