माजी आमदार अरुण पाटील : रावेरला राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकार्यांचा सत्कार
रावेर- सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्याचबरोबर पक्षसंघटन मजबूत होण्यासाठी आपसातील मतभेद विसरुन पक्षासाठी कामे करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अरुण पाटील यांनी येथे एका कार्यक्रमात केले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हा पदाधिकार्यांचा सत्कारानिमित्त रावेरात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील व विलास पाटील तसेच पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राजेंद्र चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, प्रल्हाद बोंडे, प्रकाश पाटील, लक्ष्मण मोपारी, विनोद पाटील, समाधान साबळे, महेमूद शेख, विनोद चौधरी, किरण तायडे, दीपक पाटील, सचिन पाटील, गणेश बोरसे, विलास ताठे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक सभापती नीळकंठ चौधरी यांनी तर सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले.